येथे वागत आहे. माझी ही आशा व्यर्थ नाही ना दवडणार? हीच आशा धऱून देवानें तुम्हांला जन्माला घातलें. त्याची ती थोर आशा नाही ना धुळीत मिळविणार? परमेश्वर अनंत निराशा सहन करतो. त्याच्या आशावादीपणास अंत नाही. परंतु माझ्यासारख्या पामरांना आशाभंग सहन होत नाही. आपल्या हृदयांत केळंवलेल्या आशा विफल झालेल्या पाहाणें याहून तीव्र व कटु दु:ख दुसरें कोणतें आहे?
“असो. आतां नामदेव बांसरी वाजवील. ती ऐकून मग आपण जाऊं या,”
नामदेवानें बासरी काढली. वरती ता-यांचें संगीत चाललें होतें. सभावतीं सुगंधी वा-याचे संगीत चाललें होतें. हृदयांत दिव्य भावनांचे संगीत चाललें होतें. सारी अंतर्बाह्य सुष्टी महान् संगीतसिंधूंत डुंबत होती. नामदेवाची वेणू थांबली.
“नामदेव! किती सुंदर वाजवतोस. तुझ्या ओंठापासून ती वेण कधी दूर न व्हावी व सर्वांची समाधी लागावी असेंच मला वाटत आहे,” स्वामी म्हणाले.
“नामदेव छात्रालयाचें भूषण आहे,” मुकुंदा म्हणाला.
“तो उद्या खानदेशचें भूषण होईल, महाराष्ट्राचे भूषण होईल,” स्वामी म्हणाले.
समारंभ संपला व मुलें आपापल्या खोलीत गेली. कांही अभ्यास करीत बसली. कांही अंथरुणावर पडली. कांही विचार करीत बसली. ती पाहा रघुनाथ गच्चीवर जात आहे. गच्चींत उभा राहून तो वरच्या अनंत आकाशाकडे पाहात आहे. ता-यांप्रमाणे अश्रू त्याच्या डोळ्यांत चमकत आहेत. रघुनाथ! कां रे रडतोस? कां हें पाणी? हें अंदरबगीचा फुलविण्यासाठी पाणी. हृदयांत मांगल्य निर्माण करण्यासाठी हें पाणी.
स्वामी म्हणाले, “रघुनाथ! जीवनाला कीड लागूं देऊ नकोस!”
ते शब्द रघुनाथाच्या हृदयांत सुरीप्रमाणे घुसले. रघुनाथाला स्वत:चे जीवन किडलेलं दिसले. किती तेथे घाण, किती बरबट! एवढ्या लहान वयांतच किती वासनांचा धुमाकूळ! तो देवाला म्हणाला, देवा! तू माझी आई हो. तू मला धू. माझी घाण धुवावयास मी असमर्थ आहे. तुझे बाळ धुऊन स्वच्छ कर. जसें माळावरचें उनाड फूल, तसें माझे जीवन. ते कसें तरी वाढलें, कोठें तरी गेलें. ना मार्ग दाखवावयास कोणी, ना काळजी घ्यावयास कोणी.’ रघुनाथाला गीतांजलींतील प्रार्थना आठवली स्वामींची आवडती प्रार्थना.
‘हे जीवनेश्वरा ! मी माझें जीवन निर्मळ राखीन. माझे शरीर निर्मळ राखीन. माझे हृदय प्रेमानें भरीन. माझ्या बुद्धींत ज्ञानाचा दिवा लावीन.’
निर्मळ शरीर, निर्मळ हृदय, निर्मळ बुद्धि! आणि ही तिन्ही भारतमातेस अर्पण करावयाची? आणि माझी माता? रघुनाथला स्वत:ची कष्टमूर्ति आई डोळ्यासमोर दिसली. वडील आईला मारीत आहेत, कु-हाड घेऊन आईच्या अंगावर धांवत आहेत! खायला घरांत दाणे नाहींत म्हणून लोकांचे दळण करणारी आई! जिला जगात प्रेमाचा शब्द कधी ऐकावयास मिळाला नाही, गोड घास खायला मिळाला नाही! एकीकडे त्याला स्वत:ची आई दिसे, तर दुसरीकडे भव्य भारतमाता दिसे. हृदयसागरांतून दोन माता पुन्हा पुन्हां वर येत व रघुनाथाकडे आशेने बघत.