महादेवाचें दर्शन
महात्मा गांधीची जयंती हिदुस्थानभर साजरी होत होती. महात्माजींना खादीपेक्षां दुसरें काय प्रिय आहे? ग्रामसेवेपेक्षां त्यांना दुसरें कसलें वेड आहे? ठिकठिकाणीं लोक खादी विकू लागले. कोठें कोठें स्वयंसेवक सफाई करुं लागले. स्वामीच्या मनांत एखाद्या खेड्यांत जाऊन सफाई करुन यावें असें आलें. परंतु मुलें तयार होतील का? त्यांनी दैनिकांत लेख लिहिला व ज्यांना रविवारी एखाद्या खेड्यावर येण्याची इच्छा असेल त्यांनी नामदेवाजवळ नांवें द्यावींत अशी सूचना दिली.
जवळजवळ पंचवीस मुलांनी नांवें दिली. स्वामींना खूप आनंद झाला. हरि व वामन या दोन मुलांनीहि नांवें दिलीं होतीं. स्वामी त्या मुलांना भेटले व म्हणाले, “तुम्ही फार लहान आहात; तुम्ही दमून जाल,”
“मी मुळींच दमणार नाहीं. मीं सर्वांच्या पुढे राहीन,” वामन म्हणाला.
“मी सुद्धां दमणार नाहीं. मारवड गांव तर सारें सात मैल येथून आहे. मला का सात मैल चालवणार नाही?” हरीनें विचारलें.
“आणि पाऊस आला तर?” हरीनें विचारलें.
“आम्ही पावसांत नाचू,” दोघे एकदम म्हणाले.
“वाटेतील नाल्यांना पाणी आलें तर?”
“आम्ही पोहू,” मुलें म्हणाली.
स्वामींना त्या लहान मुलांचा उत्साह पाहून कौतुक वाटलें.
रविवार उजाडला. स्वामीनीं सर्व तयारी केली. फाबडीं, झाडू त्यांनी जमा केली. कांही औषधें त्यांनी बरोबर घेतली. फिनेलची बाटली बरोबर घेतली. दोन बादल्या व कांही पत्र्यांचे तुकडे त्यांनी बरोबर घेतले. मंडळी निघाली. बरोबर बिगूल होता. यशवंतानें बिगूल वाजविला. सेवेचें बिगूल फुंकलें गेले. नवजीवनाचें शिंग फुंकलें गेलें. स्वामी त्यांना गाणीं सागत होते. मुलें म्हणत होती. स्वच्छतेचे शिपाई, सेवेचे शिपाई नीट पावलें टाकीत निघाले. झाडूचे झेडें त्यांच्या हातात होते. फावड्यांचे झेडें कांहीनीं उंच धरिले होते.
वाटेंत भेंड्या लावण्याचाहि कार्यक्रम झाला. अडेल त्याला स्वामी सांगत त्यामुळे कोणत्याच पक्षाचा पराजय झाला नाही. स्वामींनीं मधून मधून गमतीच्या गोष्टी सांगितल्या. हंसत, खेळत, नाचत, कुदत मुलांचा प्रवाह चालला होता. शहरांतील नदी खेडयाकडे जात होती. शहरांतील मुले मातेकडे जात होती. खेडीं म्हणजे शहरांना पोसणा-या माताच. शहराला धान्य, दूध, शाक, भाजी सारे खेडीं पुरवतात. खेडी आहेत म्हणून शहरे आहेत. परंतु हे शहरांना भान आहे कोठे?
“नामदेव” स्वामीनीं हाक मारिली.
“काय?” त्यानें विचारलें.
“तुला राहूकेतूची गोष्ट माहित आहे का?” स्वामीनों विचारलें.
“हो, आहे राहू व केतू – एकाच देहाची दोन छकलें” नामदेव म्हणाला.
“आपल्या देशाची तशीच स्थिती आहे, नाही?” त्यांनी प्रश्न केला.
“म्हणजे कशी?” रघुनाथनें विचारलें.