स्वामी शांतपणे म्हणाले, “यशवंत जा. घरीं जा. मी तुला पत्र पाठवीत जाईन. तू चांगली पुस्तकें, वर्तमानपत्रें घऱी घेत जा. हळूहळू घरी स्वाभिमानानें व स्वतंत्र विचारानें वागायला शीक. आणखी दोन चार वर्षेंपर्यंत असाच राहा. पुढे तू मोठा होशील. एक दिवस बंधन तोडून मोकळा हो घऱची सर्व माहिती करून घे. चार पाच वर्षें सबूरीने घे. गांवातील लोकांशी प्रेम जोड. त्यांच्यात मिसळत जा. अभिमान धुळींत मिळव. आणि मग पुढे देशांच्या संसाराला येऊन मीळ. समजलास? रडूं नको. आपणांस घऱींदारी सर्वत्र झगडावयाचें आहे. हिंदुस्थानांत सर्वत्र गुलामगिरी आहे. इंग्रजांची गुलामगिरी एक वेळ पत्करली, परंतु ही घरची गुलामगिरी, स्त्रियांची गुलामगिरी, हरिजनांची गुलामगिरी, मजुरांची गुलामगिरी – ही आपण निर्मिलेली व वाढविलेली गुलामगिरी पाहिली की, तळपायाची आग मस्तकास जातें. हा घऱचा झगडा अधिक प्रखर व कठीण आहे. तुला धडपडावयाचें आहे ना? तुझी धडपड सुरू झाली. तुझ्या ख-या जीवनाला प्रारंभ झाला. ही खादी सोडू नको. ही खांदी तुला तारील. देशाचें स्मरण देईल. गरिबांची आठवण बुजू देणार नाही. हें तारक वस्त्र शरिरावर ठेव. तुझे भाऊ ही खादी घालवू पाहातील! गुलामगिरीचा व अहंकाराचा नायनाट करणारी ही खादी, दंभाचा व आढ्यतेचा डोलारा धुळींत मिळविणारी ही खादी तुझ्या भावांच्या डोळ्यांतहि सलेल. परंतु एवढ्या बाबतीत तू हट्ट धर. एवढ्या बाबतींत जिंकलेंस कीं पुढे यशस्वी होशील. यशवंत यशस्वी होवो.”
“झालें कीं नाही रे यशवंत, नीघ,” भाऊ रागानें म्हणाला. निघाला यशवंत, हंसणारा व हंसविणारा यशवंत, रडत व सर्वांना रडवीत गेला. छात्रालयांतील मुलें हळहळली त्यांच्यातील मूर्तिमंत सेवा गेली; खेळ गेला, आनंद गेला, उत्साह गेला. परंतु सर्वांत कोणाला जर वाईट वाटलें असेल तर ते स्वामींना.
त्या दिवशी ते खिन्न होते. आपण एकेक मुलगा तयार करीत आहोंत. तो चिखलांत ओढला जात आहे! आपण मुलांना भावनांचे, विचाराचें पंख देत आहोंत, घऱची मंडळी ते तोडीत आहेत! असेंच शेवटी होणार का? भारतमातेच्या बंधमोचनासाठी कोण येणार? य व्यापक संसारांत कोण पडणार? यशवंत गेला. नामदेव, रघुनाथ, मुकुंदा, जनार्दन, नरहर सारे असेच जातील का? आतां पुढच्या वर्षीं येथून हे जातील. कोणी कॉलेजांत जातील. कोणी कोठें जातील. त्यांचे विचार टिकतील का? हृदयांतील रोपे वाढतील का जळून जातील?
एक प्रकारची प्रखर निराशा स्वामींना वाटूं लागली. सायंकाळी ते एकटेच मारवडगांवी गेले. त्या हरिजनबाईचा मुलगा पाहावयास गेले होते.
“कसा आहे मुलगा?” स्वामींनीं विचारलें.
“चांगला आहे आता,” म्हातारी म्हणाली.
तो मुलगा इतक्यांत तेथें आला. स्वामींनी त्याला खाऊ दिला, चित्रे दिली. त्याच्या पाठीवरून हात फिरविला.
“तुम्ही मला पाहायला आलेत?” मुलानें विचारलें.
“हो,” स्वामी म्हणाले.
“पायी आलेत?” त्यानें पुन्हा विचारलें.
“हो. माझे पाय मजबूत आहेत. गरिबांच्या मित्रानें गरीबच झाले पाहिजे. देवाच्या दर्शनाला पायीं जावें,” स्वामी म्हणाले.
“आता, तुम्ही एकटे परत जाणार?” मुलानें विचारले.
“हो,” स्वामी म्हणाले.
“या वेळेस तुमच्याबरोबर मुलें कां नाही आली?” मुलानें विचारलें.
“नेहमी कोठलीं मुलें येणार?” खिन्नपणे स्वामी म्हणाले.