“चालतील परंतु त्यांना काँग्रेस संस्था बलवान करावी. पुढे जाणारे तरुण मला का नकोत? त्यांना हळुहळू विचार पसरून मोठ्या संस्थेत घुसावे. काँग्रेसबद्दल जनतेला श्रद्धा उत्पन्न झाली आहे ती मारू नये. तिळतिळ श्रद्धा उत्पन्न करावयास अपार त्याग द्यावा लागतो. परंतु ती श्रध्दा आपण एका शिवीने व एका संशयाने नाहीशी करू शकतो. तेव्हा जरा संयमनपूर्वक प्रचार करणारे तरूण हवेत. तसेच त्या प्रचारकांना गावें झाडमे, स्वच्छता निर्माण करणे यातही प्रेम असावे. दिवसा झाडू व रात्री व्याख्यान. दिवसा रस्ते झाडणे व रात्री मने झाडणे. पुण्यास पहा. मिळाले तर विचार करून कळवा,” स्वामी म्हणाले.
“हे पैसे नाही तर छापखान्यात घालावे. दोन तीन वर्षे मेळा चालवून पाच सात हजार रुपये मिळवावे. छापखाना काढावा,” नामदेव म्हणाला.
“छापखाना यशवंत कदाचित काढील. आज प्रचारकांचीच फार जरूर आहे. जीवंत प्रचारक, जीवंत कळकळीची, हालती, चालती, बोलती माणसे सर्वत्र वणवा लावत गेली पाहिजेत,” स्वामी म्हणाले.
“बरे, हे प्रचारक आश्रमातर्फे हिंडणार का?” नामदेवाने विचारले.
“हो. हे आश्रमाचेच काम. आश्रम केवळ सुते गुंडीत बसला नसून, त्या सुताच्या आधाराने विचारांची जाळी विणीत आहे हे दिसले पाहिजे. आश्रम म्हणजे सर्व स्फूर्तींचे स्थान. राष्ट्रांतील सर्व विचारांची छाननी आश्रमांत होत असली पाहिजे. आजतागायतचे विचार आश्रमांत फिरले पाहिजेत. ‘सनातनो नित्यनतन:’ ज्याला मारायचे नसेल, सनातन राहवयाचे असेल त्याने काळाबरोबर पुढे गेले पाहिजे. युगपुरुषाचे स्वरूप ओळखले पाहिजे.
आश्रम मने झाडील, बुद्धी पेटवील, हृद्ये उचंबळवील. आश्रम डोळे उघडील, हातपाय हलवायला लावील ! आश्रम म्हणजे अनंत चेतना, अंतर्बाह्य जागृति. गाव झाडीत असता जर मने झाडता आली नाहीत तर ते आश्रमीय झाडणे नव्हे. खादी देताना विचार देता आले नाहीत, तर ती आश्रमीय खादी नव्हे. आश्रम म्हणजे नवराष्ट्राचा संसार, पावित्र्य, सहकार्य, सेवा, उद्योग, ज्ञान, प्रेम, निरहंकारिता, दंभशून्यता याचे वातावरण आश्रमात हवे. प्रचारक आश्रमाचेच ! खानदेशांत चरक्यांचे गूं गूं व क्रांतीचे गूं गूं वेगाने सुरू होवो! आश्रम म्हणजे क्रांतीसूर्य आणणारे अरुण होत,” स्वामी म्हणाले.