“आपण एक महिनाभर परमसुखांत दवडले. एकरूप झालो, समरस झालो. देवपूरच्या लोकांचे सहकार्य-त्याशिवाय हे काम होते ना, येथील आयाबहिणींनी रसोयी केली. मी आभार तरी कोणाचे मानू? मारवड येथील जनतेचेहि विस्मरण होता कामा नये. अमळनेरचे व्यापारी विसरून चालणार नाही. सर्वांना मी धन्यवाद देतो. असेच सहकार्य वाढो, प्रेम वाढो, बंधुभाव वाढो, आणि या लाखो खेड्यांना सुखाचे दिवस येवोत. भारतवर्षाची ही मुले सुधारली म्हणजे सर्व भारतवर्ष सुधारला असे म्हणता येईल.”
मुले निघून गेली. गाणी गात आली होती, गाणी गात परत गेली! त्या रस्त्याने गेली. त्या रस्त्यावरून हळुवार पावलांनी मुले चालत होती. स्वत: निर्माण केलेले ते फूल होते. मार्गी हळूहळू चालत होते, मुखाने भारतमातेचे नाव गात होते. मारवडे लोक मारवडला गेले. मारवडच्या लोकांनी वाटेत आंबे दिले! मुलांनी आंबे खाल्ले, चांगले गोड व रसाळ आंबे!
अमळनेरच्या छात्रालयांत मुले आली. गांवोगांव गेली.
स्वामी, नामदेव, रघुनाथ आश्रमांत राहिले होते. नामदेवहि लौकरच जाणार होता.
“आम्ही पुढील दोन वर्षांचा अभ्यास बडोद्यास करू म्हणतो, ” नामदेव म्हणाला.
“का बरे? एके ठिकाणी ओळखी झालेल्या असतात, त्या फुकट जातात, ” स्वामी म्हणाले.
“झालेल्या ओळखी कशा फुकट जातील? त्या तर राहातीलच आणि शिवाय दुस-या ठिकाणी नव्या पडतील, ” नामदेव म्हणाला.
“बडोद्यास फी मुळीच पडणार नाही. यामुळे आम्हाला त्रास जरा कम होईल. पुस्तकेहि विकत घ्यावी लागतील. नामदेव तत्त्वज्ञान घेणार आहे. मी अर्थशास्त्र घेणार आहे, ” रघुनाथ म्हणाला.
“बडोद्यास तुमच्या ओळखीचे कोणी आहे? ” स्वामींनी विचारले.
“आपल्या यशवंताची बडोद्यास ओळख आहे. त्यामुळे खोली राहावयास मिळणार आहे. स्वयंपाक आम्ही हाताने करू, ” नामदेव म्हणाला.
“नामदेव, रघुनाथ! तुम्ही केव्हा शिकून येता इकडे माझे सारे लक्ष आहे. तुम्ही आलेत म्हणजे कामाला आणखी जोर येईल. तुम्ही जनतेतील आहात. जनतेचे पुढारी तुम्ही व्हाल. जनतेतून जनतेचे पुढारी निघाले पाहिजेत. तुम्ही लहानपणी शेतांत खपले आहात, नांगर धरलेला आहे. शेतकरी तुम्हांला आपले असे मानतील. आम्ही किती झालो तरी जरा दूरचे पडतो, ” स्वामी म्हणाले.
“तुमच्याबद्दल लोकांना फार प्रेम वाटते. तुम्हाला माहीत नाही. आम्ही आमच्या तोंडाने कशाला सांगू सारे?” रघुनाथ म्हणाला.
“यशवंताच्या छापखान्याचे काय झाले?” स्वामींनी विचारले.
“अजून काही निश्चित नाही. घरचे बंधन तोडणे त्याच्या जीवावर येत आहे. त्याचे लग्न झाले म्हणजे ते आपोआप होईल, ” रघुनाथ म्हणाला.
“यशवंताचे लग्न ठरले आहे, ” नामदेव म्हणाला.
“नामदेव! मग तू का उद्या जाणार?” स्वामींनी विचारले.
“जाऊ ना?” नामदेवाने विचारले.
“हो. जा. तुझे प्रेमळ वडील तुझी वाट पाहात बसले असतील. ते माझ्यावर रागावलेहि असतील, ” स्वामी म्हणाले.