अर्थाचा मुद्दाम ठरवून अनर्थच करणे, समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचा अर्थ पूर्वग्रहदूषित आणि आपल्याला सोयीस्कर असाच काढणे, समोरच्या व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडूच न देणे, समजत असले तरी मुद्दाम गैरसमजच करणे, चर्चा सुरु व्हायच्या आधीच आर या पार अशी टोकाची भूमिका घेवून मोकळे होणे, समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे मत असू शकते हे मान्यच नसणे, समोरच्या व्यक्तीचा हेतू चांगला असला तरी त्याकडे मुद्दाम कानाडोळा करणे, समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकत असतांना त्याकडे दुर्लक्ष करून त्याला मध्येच तोडून आपण आधी ठरवून ठेवलेला निर्णय लादून मोकळे होणे, समोरचा व्यक्ती जे सांगत आहे ते समजा बरोबर असेल पण त्यावर आपल्याकडे उत्तर नसेल तर ते मान्य न करता त्याला भावनिक आणि क्रोधीक दडपण आणून त्याची मुस्कटदाबी करून त्याचे म्हणणे सांगूच न देणे या सगळ्या गोष्टी कोणत्याही नातेसंबंधातल्या निकोप वाढीला व संवादाला मारक आहेत. याला वैचारिक दहशतवाद म्हणतात. कमीत कमी समोरच्या व्यक्तीला त्याचे म्हणणे काय आहे ते मांडू दिल्यानंतर आपल्याला ते अमान्य असले तर आपण तसे त्याला सांगू शकतोच की! कदाचित असेही होईल की समोरच्याने सांगितलेले आपल्याला पटेलही. आणि आपल्याला नाही पटले म्हणून त्याचे मत चूकच आहे असे काही नसते !! असे जगातील कोणतेच नाते नाही जे सुसंवादाने बळकट होऊ शकत नाही. बघा पटतंय का?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.