ब्रिटानिया आणि पारले हे दोघे एकमेकांच्या नव्या नव्या बिस्किटांची डिझाईन आणि आकार बिनधास्त कॉपी करत असतात. पण अर्थात ते चव कॉपी करू शकत नाहीत. पण कधी कधी कॉपी केलेल्या बिस्किटाची चव ओरिजिनल पेक्षा छान जमून जाते. या कॉपी टीम मध्ये आता तर सनफिस्ट, प्रिया गोल्ड हे पण यात उतरले आहेत. अर्थात कॉपी चा हा सिलसिला कोणत्या कंपनीने आधी सुरु केला ते मला माहिती नाही. किंवा मला कधी कधी अशी शंका येते की या कंपन्या एकमेकांची डिझाईन आणि प्रकार कॉपी करण्यासाठी गुप्तपणे आपापसांत ठरवून करार करत असाव्यात, जेणेकरून स्पर्धेमुळे निगेटिव्ह पब्लिसिटी मिळून सगळ्यांच्याच बिस्किटांचा खप वाढेल? "एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ" याप्रमाणे! मला असे वाटायचे कारण म्हणजे एक कंपनी दुसऱ्या बिस्किटाची कॉपी करूनसुद्धा ओरिजिनल कंपनी त्यावर कारवाई करतांना काही दिसत नाही आणि दोन्ही तिन्ही कंपन्यांचे सारखेच डिझाईन, आकार आणि चव असलली बिस्किटे बाजारात सर्रास विक्रीला उपलब्ध असतात. आणि यावर कहर म्हणजे आता पतंजलीने तर दुनियेतल्या प्रत्येक बिस्किटाची कॉपी करण्याचा चंगच बांधलेला दिसतोय.