जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना समुद्रमंथनाची कथा सांगण्याची विनंती केली. तेव्हा ते सांगू लागले- राजा, पूर्वी देव व दैत्य यांनी समुद्रमंथन करून अमृत व इतर रत्ने काढायचे ठरवले. त्यांनी मंदराचल पर्वताची रवी व वासुकी सर्पाचा दोर केला व मंथन सुरू केले. देव हे शेपटीच्या बाजूने व राक्षस मुखाच्या बाजूने ओढत होते. मुखातून बाहेर पडलेल्या विषाच्या उष्णतेचा सर्वांना त्रास होऊ लागला, तेव्हा महादेवांनी ते विष प्राशन केले. पुढे समुद्रमंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा (दारू), धन्वंतरी, चंद्र, रंभा, ऐरावत, अमृत, विष, उच्चैःश्रवा नावाचा घोडा, कामधेनू, शंख व हरिधनू अशी चौदा रत्ने निघाली. समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत खाली जाऊ लागला तेव्हा विष्णूंनी कूर्मरूप धारण करून तो वर उचलला.

वरील चौदा रत्नांची वाटणी होत असता अमृत व सुरा याबद्दल वाद सुरू झाला. या वादाचा निकाल करताना विष्णू म्हणाले, "देवांनी एका पंक्तीला व दैत्यांनी एका पंक्तीला बसावे. एक स्त्री येऊन अमृत व सुरा पंक्तीत वाढेल. ज्याला जे मिळेल ते त्याने घ्यावे." मग विष्णूंनी मोहिनीरूप घेऊन वाटप सुरू केले. मोहिनीच्या रूपाने असुर वेडे झाले असता विष्णूने देवांना अमृत व दैत्यांना मदिरा वाढली. त्या वेळी राहू कपटाने देवांच्या पंक्तीला बसून अमृत प्यायला. हे पाहून चंद्राने विष्णूला खूण करून हे कळवले. विष्णूने सुदर्शन चक्र सोडून त्याचा शिरच्छेद केला. त्याचे शीर आकाशात उडाले, तर धड पश्‍चिम समुद्राकडे पळू लागले. ते पाहून देव व दैत्य त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करू लागले. शंकरांनीही त्रिशूळ पोटात खुपसून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण राहूच्या पोटातील अमृतामुळे ते धड नाश पावेना. तेव्हा शंकरांनी म्हाळसा नावाच्या डोंगरावर राहूच्या घशात अंगठा घालून अमृत बाहेर काढले. तेच अमृत वाहत जाऊन समुद्राला मिळाले. त्या ओघाला प्रवरा नदी असे म्हणतात. ही प्रवरा गोदावरीला मिळून पुढे पूर्वेकडे सागराला मिळाली. प्रवरा व गोदावरीच्या संगमावर राहूच्या धडावर मोहिनी बसलेली आहे. तिला म्हाळसा म्हणतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel