बहिणीला बघू आले तट्‌टयाच्या गाडीतून

दावा हंजीर शेल्यातून ।

पिकलं म्हणू बाई जन बोलती दिवानात

घाला बुचाड लवणात ।

रुसला भरतार कोच्या रीतीन समजावा

बहिणीला सांगयीती त्याच्या आडवा गोपा द्यावा ।

रुसला भ्रतार जसा भिलीनीवरला नाग

बया गौळण सांगती त्येच्या परमानं तूबी वाग ।

रुसला भरतार उशाला तलवार

बाई म्या हासूनी केला गार ।

सकाबीळच्या पार्‍या शेणापाण्यात माझा हात

सर्गी गेलेल्या सासर्‍याचं हाईती बैल गोठयायात ।

माळीण सादविती घ्या ग पुण्याची पिवळी माती

भावज गुजर सारविती रंगमहालाच्या आडभिंती ।

बहिण

आमी ग चौघी भैनी चारी गावच्या खारका

मैना ग माझी सरु मधी नांदती द्वारका ।

आमी ग चौघी भैनी चारी गावाचे कळस

मैना ग माझी सरु मधी नांदती तुळस ।

निरोप मी का धाडी माझा निरोप जाऊ राहू

मैना ग माझे सरु आडवळणी तुज गावू ।

काळी ग चंद्रकाळा एका धुण्यानं झाली बोळा

माझ्या ग बंदवानं रुपये दिले साडे सोळा ।

सासू

सासू आत्याबाई हात जोडीते तुम्हाला

दिवाळीचं मूळ नका परतवू रामाला ।

सासू आत्याबाई हात जोडीते बसूनी

दिवाळीचं मूळ राम चालले रुसूनी ।

सासू आत्याबाई सोनीयाच्या तुमच्या मिर्‍या

जलमाला जावो आमच्या कुंकवाच्या चिर्‍या ।

सासू आत्याबाई सोनियाचे तुमचे गोट

जलमाला जावो आमचे कुंकवाचे बोट ।

नवरा

गावाला गेल्या कुण्या असं कसं येणं जाणं

सुकूनी एवढे गेले माझ्या रतीबाचे पान ।

गावाला गेल्या कुण्या किती सांगू मी धीट

दारामधी बाई उभी अवचित झाली भेट ।

झाल्या ग तिन्हीसांजा दिवे लाव ओसरीला

भ्रतार माझ्या राया सोडा वासरु गाईला ।

झाल्या तिन्हीसांजा दिवे लावू मी कुठं कुठं

माझ्या ग भ्रताराचे चिरेबंदी बाई गोठं ।

कचेरीच्या ग पुढं हिरवा कंदील जळतो

भ्रतार माझा राया एवढा वकील बोलतो ।

जाऊ ग माझे बाई पलंग काढ ग झाडूनी

भ्रतार माझा राया उभा मंदील काढूनी ।

भावजये ग बाई तुझा पलंग पारुसा

भ्रतार माझा उभा हाती रुमाल आरसा ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel