करा हे निश्चय शुद्ध, रिकामे दिस वैर्‍यावाणी जाती ।
दैवानें अनयासें लागला जीव माझा तुमचे हातीं ॥धृ०॥
मुळ कारण तरि काय ? विकल्पें कान कोणिं तुमचे भरले ? ।
न भेटावें अगदींच अशी मी असत्य कंच्यापरि ठरले ? ।
अभयवचन आपलें प्रथमतां ज्या दिवशीं मजला धरलें ।
तेव्हां हवीशी होते, अतां कां पाणि जसें अळवावरलें ? ।
गांठ घालितां नये मनोमय जवळ असुन जहाला दुरले ।
दहाविस वर्षें सुख न भोगितां हें दैव कां मागें सरलें ? ।
नष्टचर्य पर्याय किति तरी सांगावें भातोभाती ॥१॥
मन मिळल्यावर माझी कळकळ ही तुमच्याकडुन असावी ।
नसल्यावर मी व्यर्थ जाहले स्त्री, शोभा काय दिसावी ! ।
बोलावण्याची वाट पाहातें, मीच कशी गोष्ट पुसावी ? ।
फार दिवस रक्षिले, त्यावरी मग इच्छा कां हो नसावी ? ।
वायुआहार निर्मळ तप करितां स्वामिकृपा संपादावी ।
तें प्रत्ययास येऊन शेवटीं शर्करेची माती व्हावी ।
हेंच काय महदाश्चर्य फळ ! मी तृण केवळ धरिलें दातीं ॥२॥
स्वच्छ टाकितां मला, कोणाच्या म्या उदरामधें शिरावें ? ।
पुरती गरिब असे अनुभवितां, वचनाला कां हो फिरावें ? ।
‘नाहीं अंतर होणार’ बोलला, तें भाषण खरें करावें ।
सार्थकता माझी हीच वाटे, आपल्या पाईंच मरावें ।
जी आपल्या अत्यंत प्रीतिची, तिजवर कां शस्त्र धरावें ? ।
ज्या पात्रीं भक्षिली क्षीर, त्या पात्राला का विसरावें ? ।
प्रीतिस्तव चंदनासारिखा देह झिजवुन केल्या वाती ॥३॥
कधीं मजकडे पहाल ? एकांतीं उपवासी केवळ राहाते ।
लाउन दृष्ट आकाशीं प्रजा जशि वाट मेघाची पाहते ।
श्रम करून मिळविलें, टिकूंद्या ही काळजि अंतरिं वाहते ।
लावणिच्या वृक्षास कसें तरि छेदावें आपल्या हातें ? ।
सेवेचा अधिकार, वर्णितें मी तुमच्या पुरुषार्थातें ।
जन्मभर भोगुनी बरोबर मज न्यावें सायुज्यातें ।
जवळ असावें सदा, हाच मी जप करिते दिवसारातीं ।
होनाजी बाळा म्हणे, प्रीत ही ब्रह्मलिखित जडली ज्योती ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel