निखळ वेड लागलें, तुंसाठी जिव काढुन देतों ।
दोचौ दिवशीं जपुन खपुन लपलपुन घरीं येतों ॥धृ०॥
जडुं नये जडली जोड, जोडितां मन अपलें मिळलें ।
न घडावें तें घडलें, घटित कसें ब्रहम्याचें टळलें ? ।
हाच शकुन वाटतो, दिवस गडे नशिबाचे उजळले ।
या केल्या प्रीतिचा शेवट तूं करशिल हें कळले ।
सर्व नारी तुजखालिं, असे रूप नाहीं ग आढळलें ।
स्नेहसंगतिच्या योगे मोति जणुं हंसानें गिळलें ।
नको अतां दुर बसूं, जवळ ये, तब अंकित होतों ॥१॥
निष्ठुर जन घातकी, कर्म केले बाहेर फुटतें ।
न बोलतां तुं हसुन सखे ग मन अमचें विटतें
शब्दाच्या फासण्या नको ग घालुं, काळिज तुटतें ।
तुझ्या घरि येउं नये आम्हाला हें तरि कसें सुटतें ? ।
रात्रंदिस पेडवा चक लागली लचक शरिर कटते (?) ।
त्वां न भरावेंस रागें म्हणुन तिळ तीळ रुधिर अटतें ।
झुरझुर झुरझुर झुरून उदासिन, नित वारा खातों ॥२॥
कामातुर अतिचतुर तुझें मूख अरुणोदयिं पहावें ।
एका पलंगावर आपण मिलाफिंत, कधिं ग असें व्हावें ? ।
मोहनी मंत्र मुठ ह्रदयिं मारलिस, दुख कुठवर साहावें ? ।
धंद्याला आग लागो, तुला सोडून कैसें रहावें ? ।
आजकालचे न, हो वर्ष हे ओळखिला दाहावें ।
ऐवज मोबदला बदल शिर पुष्पापरि वहावें ।
जसें जसें बोलशिल तसें तसें आम्ही सोसुन घेतों ॥३॥
धुंद मदन एकांतीं गोड भाषण ऐकुन तोंडी ।
कसा पुरुष तुजपुढें होतसे वाघाची मेंढी ।
सुवर्ण धातू क्वचित, पितळ तांबें खंडोखंडी ।
ज्यांनी विषय त्यागिले पाहुन तुज त्यांच्या मुरकुंडी ।
योग पडतां घडि दु:खाची, यम जैसा दंडी ।
उपकाराच्या योगें तुला प्राणाची कुरवंडी ।
होनाजी बाळा म्हणे, कठिण सुटणें मायामोह तो ।
विरहरसामधें लुब्ध जसा मिन पाण्यावर पोहतो ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel