गांवा जातां अतां, तुम्हाविण मला येथें कोणी नाहीं ।
दृष्टी पाहिन कधिं फिरुन हे पाय अंबाबाई ? ॥धृ०॥
परवा जातां निघुनी, असें मी काल ऐकिले कांनी ।
सुमुहुर्तानें आहे उद्यांचा दिस मुक्काम प्रस्थानीं ।
निचिंत अजचि रात्र बोलते मी जोडूनया पाणी ।
सांगा आण वाहुन राजसा, याल कितिक दिवसांनी ? ।
कसें करून राहविते, परंतु भर देउन सार्‍यांनी ।
जायाचें ठरविलें, अतां तुजविण मी पडले रानीं ।
गेल्याचें सुखरूप लिहुन वर्तमान धाडा मजला
दुरावल्यामुळें पडल हा माझा विसर तुम्हांला
देहासहित हा प्राण सख्या, मी केला तुझ्या हवाला
कां वियोग योजिला ईश्वरें, हें मज न कळे कांहीं ॥१॥
जायाचें ऐकिल्यापासून दिनरात्र काळजी करिते ।
जेवणखाण विसरले, नाहीं मन माझें धंद्यावरते ।
कोठें अहा तुम्ही म्हणुन पहात मी नित्य घरामधें फिरते ।
न दिसासे जाहल्यावर अर्धे क्षणामधें घाबरते ।
अशि टाकुन येकली जातसा तुम्ही दुर देशावरते ।
पुढिल अठवून अंतरीं, अतांच मन गहिवरतें ।
पाहुन सख्या तुजकडे येतसे जळ माझ्या नेत्रांसी
राहिन येथें मी, परंतु माझा जिव लागेल तुजपाशीं
आणिक दु:ख मज नाहीं, मुख्य मी अंतरले पायांसी
आहे तशी यापुढें असुं द्यावी प्रीत माझे ठायीं ॥२॥
येवढा वेळ पतिराज गोष्टी मी ज्या ज्या सांगितल्या हो ।
हे बोल माझे अवघे आपल्या ध्यानांत असुं द्या हो ।
दिसगत जर लागली तुम्हांला निघुन यावयाला हो ।
मग मुळ शिबिका त्वरित पाठवुन मज तिकडे तरी न्या हो ।
सुखदु:खाचे मार्ग असे हे सर्व निर्मिले म्या हो ।
तरि येकहि प्रतिशब्द जिवलगा मशि बोला ना कां हो ? ।
प्रवासांत गेल्यावर येणें घडेल फार उशिरानें
घरिं नसल्यावर तुम्ही, राहुं मि कोणाच्या आश्रयानें ?
यावर सांगा, फिरुन आतां कधिं भेट होइल दुसर्‍यानें ?
कायावाचामन करुन हें हो लक्ष तुमचे ठायीं ॥३॥
नको चिंता सुंदरी करूं, तुं अवडतेस आम्हांला ।
शब्दगौरवें तुझ्या फार संतुष्ट सखे जिव झाला ।
थोडया दिवसांसाठी कष्टी कां करितेस मनाला ? ।
जाउन माघारें लवकर घरिं येतों सण शिमग्याला ।
नको मोठयानें रडुं प्रियकरे, डोळे पुस पदराला ।
उजाडलें बोलतां, आतां अम्ही जातों प्रस्थानाला ।
अति अवघड वाटतें, जा कसें मी हो म्हणावें अता ?
मिठी मारून पोटाशीं पतिला धरि कवटाळुन कांता
पाणी आलें डोळ्यांस उभयतां एकमेकांकडे पाहतां
पति उतरुन खालती आल्यावर पाईं ठेविली डोई ।
होनाजी बाळा म्हणे, कशि तरि चार दिवस उगी राही ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel