नको सख्या वरखालीं पाहूं, मला चांगले पाहात जा ।
जाईल काया, राहील माया, खेळीमेळीनें राहात जा ॥धृ०॥
पहिले साल गुजरलें, दुसरें तेंहि साल भरत आलें ।
भली भलाई कर कांहीं प्राण्या, मी तर गेले मारले ।
चवथा वाटा गुण शिकवले, तीन वाटे गुण चोरले ।
मी काय जाणे, गरीब बिचारें मोहुन शरीरा भाळलें ।
कवळी पानें पिकलीं गजरी सुवर्ण तफक भरलेले ।
त्यांत कल्पना चुकली थकली, आटाला नाहीं फिरले ।
आधींच कोण होती इवशी ? त्यांतील अर्थ घेत जा ॥१॥
पूर्वीची कथा माहित असतां आणिक सांगते ऐकणें ।
नको सख्या भरूं रागें, मजवर हेत बरवा ठेवणें ।
काळ निमित्तें काढून आणिले तीवर सासुबाईनें ।
मायबाप पति ते अंतरले आणिक सखे मेव्हाणे ।
प्रालब्धापुढें उपाय नाहीं विधात्याचें बोलणें ।
ब्रह्मवाक्यें कधिं चुकेना, दृष्टि पडलें शहर पुणें ।
म्हणुन दाखले देऊ कुठवर ? नरढे घर दुध्यांत जा (?) ॥२॥
प्राणाहून प्राणसखे तू गहिरी शब्द चाळले ।
उत्तरासी प्रतिउत्तर दिधलेस ते आम्हां भाळले ।
आता फुंकून पेतां ताक म्हणती, मन दुधाला पोळलें ।
जशी वर्तणूक होईल तैशी ओलेंही जळतें वाळलें ।
मान्य तुझ्या बोलण्यास मैत्र बरें विघ्न टाळलें ।
जोत परंतु निगून गेली काय प्रेता कवटाळलें ।
हींच अक्षरें पुढें आठवून नित ह्रदयीं लिहित जा ॥३॥
असे दाखले कुठवर देतां म्या तर शिर घेतलें हातीं ।
अंतरगुण उभयतांस ठावीं प्रीतीचीं लक्षणें किती ।
राग भाग हा सोडुन द्यावा, उभे राहुन धरिले हातीं ।
आजपासून अंतर पडल्यावर केल्या क्रिया लागती ।
मला ओवाळून टाका सख्या वुनतरे जवळ बाहील्या दुती (?)
अतिरति रतीनें छकविले शोधक श्रोते जाणती ।
सगनभाऊ म्हणे, जन्मा येउनी विठ्ठल ह्रदयीं ध्यात जा ।
तुकारामाचे अभंग लाघवी रामा मजेवर गात जा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel