बहुतां दिवसांनी स्वामी आले घरीं । मी दुरसि जाहलें, काय करावें तरी ? ॥धृ०॥

वरुषाची मोहीम आले करून । चांडळ पालव आला मल ऋतु भरून । गुणी प्राणविसावा हेत मनामधिं धरून । सर्वार्थ तयाची मर्जी गेली फिरून । चोराची गत, मी मनांत गेलें झुरून । या प्रेमरसांमधिं ह्रदय गेलें भरून ॥चाल॥ नीरउपाव जाला, काय करूं साजणी ? । नवरत्न भोगित्यें वीषयभोग येउनी येउनी । आजी पडला ऐसा वाटे माझे मनीं, अहो मनीं । हे च्यार दिवस महिन्याचे आले तरी ॥१॥

महिन्याचें महिन्या पालव येतो मला । हा वेळ साधुनी वैरि कसा गे बाई आला । बारा महिन्यांमधीं दिवस आजी चांगली । आज रात्रीं उभयतांचा व्हावा सल्ला । ही अडचड आली, काय करूं लाजेला ? । शेजेवर नीद्रा कशि लगेल स्वामीला ? ॥चाल॥ रंगमाहालीं आतां येतील कीं प्राणेश्वर । मग काय करूं विचार, मी तरी दुर । मग बोलाउनी दासीला तिनें सत्वर सत्वर । या आर्सेमाहालामधीं । बिछाना करी ॥२॥

कचेरी करूनी बरखास्त अहो गुणीजना । रंगमाहालीं सखा तिनें नेला वोवाळून । कुंकूमरहित कामिना वळखिली खुण । कां दुर बैसलीस सांग आम्हां कारण । सरशाला बसलि लज्जित होऊन । मी आहे दुरसी, दिवस जाले तीन ॥चाल॥ या संवच्छराचे परी दिवस आजी आहे । गुणी प्राणविसाव्या मला शीवतां नये, अहो नये । मग उदईक चवथे दिवसीं नाहीत तरी ॥३॥

प्रात:काळीं तेव्हां उठोनी मग सुंदरी । करि स्नान, घालिती पाणी अंगावरी । लगबगा करुनी पोशाग तिनं भरजरी । जडीतांचे जव्हार घालिती अंगावरी ॥चाल॥ अस्तमान होइल केव्हां मला साजणी । गुणी प्राणविसावा आणा कोणी गे शयनीं । मी आनंदांत निजेन मंचकीं घेउनी । गुणी रामा काशी छंद नवा नित्य करी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel