डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस. महाराष्ट्राचे, भारताचे ते भूषण आहेत. नवभारताची महान् घटना बनविणारे ते कायदे पंडित आहेत. हिंदुधर्माची नवस्मृति देणारे. स्त्रियांची मान उंच करणारे ते नवस्मृतिकार आहेत. ज्या समाजाला आम्ही आजवर दूर ठेवले त्याच्यातीलच एक महापुरुष नवधर्म देतो, ही गोष्ट हृदयास उचंबळविणारी आहे. हरिजनांनी जुने सर्व विसरावे. स्पृश्यांस क्षमा करावी. नविन उज्ज्वल भविष्याकडे डोळे ठेवून पुढे जायला झटावे.

अति गरिबींत बाबासाहेब वाढले. किती अडचणी. कै. सयाजीराव महाराजांची मदत मिळाली. ते बॅरिस्टर होऊन आहे. विद्यासंपन्न असूनही त्यांना दूर बसविले जाई. अपमान केला जाई. त्यांनी महाडचा सत्याग्रह, पुण्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, असे अनेक सत्याग्रह करुन दलित समाज संघटीत केला. त्यांच्यात नवतेज निर्मिले. डॉ. बाबासाहेबांचे हे सर्वात थोर कार्य. स्वाभिमानाची ज्योत पेटविणे, आत्मा जागृत करणे हे महत्वाचे कार्य असते.

मुंबईच्या लॉ कॉलेजचे ते प्रिन्सिपॉल होते. प्रांतिक विधिमंडळात होते. दिल्लीच्या घटनासमितीत आज ते धुरंधर आहेत. डॉ. बाबासाहेब हे ज्ञानाचे महान् उपासक. मागे पुण्याला एका सभेत ते म्हणाले, “ न्या. रानडे, टिळक, गोखले अशी अभ्यासू माणसे, ज्ञानात रमणारी कोठे आहेत ? महाराष्ट्राने ज्ञानाची प्रखर उपासना केली पाहिजे.”

डॉ. बाबासाहेबांच्या घरी मोठे उंची फर्निचर दिसणार नाही. परंतु ग्रंथांनीं भरलेली कपाटे दिसतील. महर्षि सेनापती बापट  डॉ. बाबासाहेब खरे ब्राम्हण आहेत, ज्ञानाची उपासना करणारे आहेत ” असे म्हणायचे.

बाबासाहेबांच्या जीवनावर भगवान गौतम बुध्दांचा अपार परिणाम झालेला आहे. त्यांनी मुंबईस जे महाविद्यालय स्थापिले त्याला बुध्दांचे “ सिध्दार्थ ” हे नाव दिले. बुध्दांनी आपल्या अहिंसाधर्माचा ज्या राजधानीत प्रथम उपदेश केला त्या राजगृहाचे नाव त्यांनी आपल्या घराला दिले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अंतरंगांत बुध्ददेवांचे सिंहासन आहे. महाराष्ट्राला, नव भारताला वैभवाप्रत नेण्यास त्यांची शक्ति कारणीभूत झाली. प्रणाम या थोर भारतपुत्राला !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel