१५ ऑगस्ट २०१७: अशोक देसाई - गेल्या आठवड्यात प्रमोशनची गोड बातमी सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेली. आता अशोकचा पगार तब्बल ₹१५,००० ने वाढला होता. तो आता स्वतःच्या हक्काच्या घरासाठी प्रयत्न करत होता. हिंदी सिनेमातील एका मोठ्या कलाकाराच्या व्हिएफएक्स स्टुडिओमध्ये तो आता स्वतःच्या स्वतंत्र केबिनमध्ये बसत होता.

नुकत्याच आलेल्या एका सिनेमामध्ये अशोकने सुचवलेल्या इफेक्टचे सर्व स्तरांतून कौतुक झाले, अर्थातच त्याचे नाही तर त्या कलाकाराचे आणि फिल्म प्रोडक्शनचे कौतुक झाले. मात्र त्या कलाकाराने अशोकची गुणवत्ता ओळखून त्याला प्रमोशन दिले. स्टुडिओमध्ये देखील या प्रमोशनचा सर्वांना आनंद झाला होता. प्रमोशनच्या वेळी अशोकने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"मला मिळालेल्या प्रमोशनपेक्षा मी सुचवलेले इफेक्ट्सचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे याचा आनंद आहे. त्याहीपेक्षा मोठा आनंद या गोष्टीचा आहे की मी ह्या प्रोडक्शनमध्ये काम करतो आहे. आपल्या स्टुडिओने अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या. फक्त हॉलिवूडवालेच चांगले व्हिएफएक्स करतात हे एका पूर्णतः भारतीय स्टुडिओने खोटे ठरवले. यावेळी मला आपल्या सरांचा स्वदेस सिनेमा आठवतो, ज्यामध्ये त्यांनी आपल्या लोकांना मायदेशी येण्याचा संदेश दिला होता. त्याच सरांनी आज असा स्टुडिओ काढला आहे ज्याने आपल्या देशातील माझ्यासारखे डायरेक्टर आणि एनिमेटर बाहेरच्या देशात जात नाहीत, उलट बाहेरच्या देशातील डायरेक्टर आपल्या देशात येत आहेत. हे सर्व शक्य झालं आहे आपल्या सरांच्या दूरदृष्टीमुळे." अशोकचं बोलणं थांबताच सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवत अशोकला शुभेच्छा दिल्या.

प्रमोशन झाल्याने अशोकची जबाबदारी वाढली होती. तो हे सर्व व्यवस्थित हाताळत होता. जे त्याच्या बाबांना जमलं नाही ते आता त्याच्याकडून होणार होतं. ते म्हणजे, स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर. गर्व त्याच्या स्वभावात नव्हताच, पण प्रमोशनमुळे त्याचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढला होता.

नेहमीप्रमाणे कानात हेडफोन टाकून डोळे बंद करून गाणे ऐकत तो ऑफिसला जात होता. आज त्यांच्या ऑफिसमध्ये १५ ऑगस्टनिमित्त छोटासा कार्यक्रम होता. सकाळी सोसायटीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपून तो जरा उशीरच निघाला होता, म्हणून त्याची ट्रेन चुकली होती. तो नंतरच्या ट्रेनने जात होता. ट्रेनमध्ये एका बाजूला डोळे बंद करून गाणे ऐकत तो उभा होता. सहजच त्याने डोळे उघडले तर तिथे उपस्थित सगळे त्याच्याकडेच बघत होते आणि एक वयस्कर व्यक्ती त्याच्या बाजूला येऊन उभी होती.

"काय मग?" मल्हार सर.

"माझं काही चुकलं का?" अशोक गडबडतच म्हणाला.

"छे! तुझं कुठे काही चुकलं? तुझ्या आईवडीलांचं चुकलं." मल्हार सर म्हणतात.

मागून कोणीतरी हसतं आणि लगेच आपलं हसू आवरतं.

"काय नाव काय तुझं? काय करतोस?" मल्हार सर विचारतात.

"मी अशोक देसाई, ऍनिमेशन करतो. कार्टून बनवतो." अशोक म्हणतो.

"ते दिसतंच आहे." मल्हार सर म्हणतात.

"काय झालं काका?" अशोक पुढे म्हणतो.

"नाही म्हणजे आता काय ऐकत होतास तू?" मल्हार सर.

"Despacito." अशोक म्हणतो.

"काय असतं ते?" मल्हार सर.

"स्पॅनिश गाणं आहे." अशोक म्हणतो.

"कुठल्या सिनेमातलं गाणं?"  मल्हार सर.

"मुव्ही नाही हो, अल्बम असतो त्यांचा." अशोक म्हणतो.

"काही कळलं?" मल्हार सर.

 "कशाचं?" अशोक विचारतो.

"नाही, तो काय गातोय हे कळलं का?" मल्हार सर.

"काहीच नाही." अशोक म्हणतो.

"मग इतका हलत डुलत का होतास?" मल्हार सर म्हणतात.

"ते गाणं ऐकायला मस्त वाटतं." अशोक म्हणतो.

डब्यात बसलेले सगळे अशोकची मजा घेत असतात. मल्हार सर गेली २१ वर्षे त्या डब्यातून प्रवास करत होते. तो डब्बा आणि त्या डब्यातील माणसं त्यांच्या जवळची झाली होती. त्यांच्या वयाचे जवळजवळ सगळेच रिटायर्ड झाले होते आणि वायस्करांमध्ये ते एकटे राहिले होते. बाकी सगळी तरुण मुलं त्या डब्यातून प्रवास करत होती. त्या सर्वांना मल्हार सर म्हणजे विनोदी पात्र वाटायचे. हो, पण कधी त्यांनी त्यांना त्रास नाही दिला.

"बाळा, आपल्याला समजतं आणि ऐकायला चांगलं वाटतं ते ऐकावं." मल्हार सर म्हणतात.

"पण काका सगळेच ऐकतात ना!" अशोक म्हणतो.

"हो तर, सगळेच ऐकतात. माझा मुलगा सुद्धा ऐकायचा. तुझ्याच एवढा होता तो, असाच दरवाजाजवळ उभा होता तो, मी त्याला म्हटलं ट्रेन रिकामी आहे, बस इथे तर ऐकलं नाही." मल्हार सर बोलू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून हळू हळू सगळेच आपापल्या कानातून कापसाचे बोळ काढू लागतात.

"नाही ऐकलं त्याने माझं, आणि उभा राहिला तिथे. मी माझ्या बायकोसोबत बोलत होतो आणि थोड्या वेळाने एकजण ओरडला, ‘कोणीतरी ट्रेनमधून पडलंय.’ मी धावत जाऊन बघितलं, माझा मुलगा तिथे नव्हता. एकाने चैन खेचली, आम्ही खाली उतरलो, मुलाजवळ गेलो, तो तिथेच होता, फक्त त्याच्यात जीव नव्हता." पाणावलेले डोळे पुसत मल्हार सर म्हणतात. थोडा वेळ कोणीही काही बोलत नाही. नेहमी त्या काकांना चिडावणारे नकळत अश्रू लपवत होते, काहीजण डोळे पुसत होते.

‘पुढील स्टेशन ठाणे, अगला स्टेशन ठाणे, next station thane’ ट्रेनमध्ये घोषणा होते आणि काका बोलू लागतात, "चला, माझं स्टेशन आलं. मला उतरायला हवं आता. बेटा अशोक, मी काही जास्त बोललो असेल तर मला माफ कर." असं म्हणून मल्हार सर उतरून जातात. ठाण्याला काही माणसं ट्रेनमध्ये चढतात आणि ट्रेन आपल्या पुढच्या प्रवासाला लागते.

अशोकसाठी हे सगळंच विचित्र होतं. त्याच्या डोळ्यासमोरून मल्हार सर जात नव्हते. ज्या ट्रेनने त्यांच्या मुलाचा जीव घेतला त्या ट्रेनमधून ते सर्वांशी आपुलकीने प्रवास करतात याचं त्याला आश्चर्य वाटत होतं.

त्या दिवशी ऑफिसमधील कार्यक्रमात त्याचं लक्ष लागत नाही, कार्यक्रमातून तो जरा लवकरच निघतो. जगात मल्हार काकांसारखी बरीच माणसं असतील. ते सगळे कसं जगत असतील? विचारांमध्ये हरवलेला तो तासंतास डोंबिवली स्टेशनवर बसलेला असतो. डोळ्यासमोर माणसांची नेहमीची धावपळ सुरूच असते, आज मात्र ही धावपळ जरा वेगळीच दिसत होती.

"काय झालंय? सगळे असे का धावत आहेत?" अशोक एकाला थांबवून विचारतो.

"बन्या, निजला वतास क? तया स्टेशनावं टेररिस्ट घुसल्याव." तो मुलगा धावतच अशोकला म्हणतो न म्हणतोच आणि पाठीमागून गोळ्या चालवण्याचा आवाज येतो. अशोकला काहीच सुचत नाही, घाई गडबडीत बाहेर न जाता तो प्लॅटफॉर्मवरील शौचालयामध्ये जाऊन लपतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel