मेल एक्स्प्रेसच्या अपघाताने रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद झाला होता. कितीही मोठी लष्कर सेना पाठवायची तर वेळ हा लागणारच होता. रेल्वे आणि पोलीस मुख्य कार्यालयात चिंतेचं वातावरण होतं. मीडियाचे प्रश्न सतत वाढतच होते. आता दहशतवाद्यांचा सामना करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीसांवर होती, आणि पोलीस त्या दिशेने प्रयत्न करत होते.

छुप्या मार्गाने पोलीस रेल्वे स्थानकावर पोहोचले देखील होते, पण हल्ला कशाप्रकारे करायचा हे त्यांच्यासमोर पडलेलं कोडंच होतं. १०० दहशतवादी विरुद्ध ४० पोलीस, दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे तर पोलीसांकडे बंदूक, रायफल आणि मर्यादित गोळ्या होत्या.

प्राजक्ताच्या दादाचा जीव दहशतवाद्यांनी घेतला म्हणून प्राजक्ता आणि वृषाली रेल्वे ट्रॅकच्या मागून प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या आणि सुरक्षेसाठी शौचालयात जाऊन लपल्या. त्या चुकून पुरुषांच्या शौचालयात गेल्या. तिथे आधीच अशोक आणि मल्हार सर होते. दोघींना ते दोघेही दहशतवादी वाटले.

"मुलींनो, घाबरू नका. आम्ही दहशतवादी नाही आहोत. आम्ही इथे लपून बसलो आहोत." मल्हार सर म्हणतात. दोघीही दीर्घ श्वास घेतात.

"तुम्ही दोघी कोण आहात? आणि इथे प्लॅटफॉर्मवर काय करत आहात?" अशोक विचारतो.

"मी वृषाली आणि ही माझी मैत्रीण प्राजक्ता आहे. त्या हराम**नी हिच्या दादावर गोळ्या चालवल्या असं आम्हाला वाटतंय." वृषाली म्हणते.

"मग तुम्ही दोघी काय करणार आहात?" मल्हार सर विचारतात.

"काय करणार म्हणजे? आम्ही त्यांना मारून टाकायला आलो आहोत." प्राजक्ता म्हणते.

"तुम्हाला कळतंय का तुम्ही कुणाशी सामना करायला आला आहात? हे गल्लीतले गुंडे नाहीत, दहशतवादी आहेत दहशतवादी." अशोक म्हणतो.

"ते दहशतवादी असतील तर आपण काय फक्त लपून बसायचं? आणि त्यांना मारण्याचा ठेका काय फक्त पोलीसांनी आणि मिलेटरीवाल्यांना घेतला आहे का? ते त्यांच्या कामासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा करत नाही ना! मग आम्ही सुद्धा आमच्या प्राणांची पर्वा करत नाही. आम्ही एक दहशतवादी जरी मारला, तरी बस्स." वृषाली म्हणते. मल्हार सर आणि अशोकला गया दोघींचं बोलणं बालिशपणाचं वाटत होतं. त्या दोघींच्या समाधानासाठी मल्हार सर लढण्यास होकार देतात.

नुसता होकार देऊन उपयोग नाही, त्यांच्याकडे प्रतिकार करण्यासाठी शस्त्रे नव्हती. तेवढ्यात शौचालयामध्ये एक दहशतवादी येतो. तो येण्याचा आधीच अंदाज आल्याने चौघेही लपून बसले होते. प्लॅटफॉर्मवर लहान मुलांचे आणि स्त्रियांचे मृत पडलेले शरीर वृषालीने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. तिला भीती वाटत होतीच, पण या निष्पाप मुलांचा सूड घेण्यासाठी ती सज्ज होती.

तो दहशतवादी लघवी करण्यासाठी आलेला पाहून क्षणाचाही विलंब न करता पाठीमागून वृषाली आपल्या ओढणीने त्याच्या गळ्याभोवती फास घालते. त्याला काही कळायच्या आत ओढणीची एक बाजू प्राजक्ता आणि एक बाजू वृषाली जोरात खेचतात. तो जोर इतका असतो की हल्ला करण्यासाठी आलेल्या १०० दहशतवाद्यांपैकी पहिला दहशतवादी सहजच मारला जातो.

मल्हार सर आणि अशोक त्या दोघींकडे बघतच बसतात. हे सगळं खरंच इतकं सोप्प होतं? थोडीशी हिम्मत दाखवली असती तर आपण देखील हे करू शकलो असतो. करायचं सोडून द्या, पहिला दहशतवादी दोन मुलींनी मारला? ते पण ओढणी घेऊन? यांना मुली म्हणावं की काय म्हणावं?

दोघींची जिद्द आणि धाडस पाहून मल्हार सर आणि अशोकला देखील प्रतिकार करावासा वाटतो. मुली करू शकतात तर आपण का नाही, असा विचार त्यांच्या मनात येतो. स्वतःसाठी खूप काही केलं, आता देशासाठी काही करावं अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते. काही क्षणापुरता का होईना, सैनिकांचं आयुष्य जगण्याची संधी त्यांना मिळत होती.

"हॅलो? कसल्या विचारात आहात? हा मुडदा उचला आणि तिथे कोपऱ्यात नेऊन टाका." वृषाली म्हणते.

"हो.. हो…" म्हणत अशोक आणि मल्हार सर मेलेल्या दहशतवाद्याला उचलतात आणि शौचालयातील एक दरवाजा उघडून त्यात तो टाकतात. चौघांकडे आता दहशतवाद्याकडून मिळालेले १० ग्रेनेड, एक एके-४७ आणि एक पिस्तूल असतं. आता ते आणखी एका दहशतवाद्याची येण्याची वाट पाहत असतात. अशोक आणि मल्हार सर पुढचा दहशतवादी मारण्यासाठी पुढाकार घेतात आणि त्या दोघींना लपून बसायला सांगतात.

बराच वेळ आपला साथीदार न आल्याने बाहेर उभे असलेले दोन दहशतवादी आत येतात. मल्हार सर आणि अशोकने एकाच दहशतवाद्याचा अंदाज बांधून होते आणि येतात दोन. दोघांचाही गोंधळ उडतो. दहशतवादी काही करणार तोच अशोक धावत जाऊन त्यांच्या अंगावर उडी मारतो. एके-४७ लोड न केल्याने त्यांना गोळ्या चालवता आल्या नव्हत्या. अशोक पाठोपाठ मल्हार सर देखील जातात. चांगलीच हाणामारी होते. दहशतवादी तरुण आणि आक्रमक असले तरी मल्हार सर सुद्धा मागे हटायला तयार नव्हते. परिस्थिती तरीही हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच वृषाली आणि प्राजक्ता त्यांच्यावर धावून जातात. थोडा जास्तच प्रतिकार करावा लागतो, दोन्ही दहशतवादी मारले जातात. चौघांनाही बराच मार बसतो. हाणामारी करताना अशोकच्या डोक्यातून तर मल्हार सरांच्या गुडघ्यातून रक्त येतं, पण ते बाऊ करत बसत नाही.

"मारलं साल्याला… तुम्ही दोघी आल्या नसत्या तर आधीच मारला असता त्याला." अशोक म्हणतो.

"हो ते दिसलंच." प्राजक्ता म्हणते.

"ते जाऊ दे गं. आता काय करायचं?" वृषाली म्हणते.

"आता काही करू नका, इथेच थांबूया. हे तिघे जसे इथे आले तसे आणखी येतीलच, तेव्हा त्यांना इथेच मारू. बाहेर जाणं धोक्याचं आहे. तोवर पोलीस आले तर आपण बाहेर निघूच." मल्हार सर म्हणतात. त्यांचं बोलणं सर्वांना पटतं, पोलीसांकडून काही हालचाल होईल या आशेने चौघेही शौचालयात लपून बसतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel