गोष्ट अठरावी

मूर्खाला उपदेश करणे, म्हणजे स्वतःचे वाटोळे करून घेणे

एका वनात एक शमीचे झाड होते. त्या झाडावर चिमणा-चिमणीचे एक जोडपे घरटे बांधून सुखासमाधानात राहात होते.

एकदा पावसामुळे ओलेचिंब झालेले एक वानर थंडीने थरथरत त्या झाडाच्या आश्रयाला आले असता त्याच्या पात्रतेचा विचार न करता ती चिमणी त्याला म्हणाली, 'हे वानरा, तुला देवाने माणसांसारखे हात, पाय व आकार दिलेला असताना, एखादे चांगलेसे घर बांधून त्यात सुखाने राहण्याऐवजी तू असा विनाकारण थंडीपावसाचा त्रास का भोगतोस ?'

त्या चिमणीच्या या बोलण्यामागचा चांगला हेतु लक्षात न घेता ते वानर तिच्यावर भडकून म्हणाले, 'अगं सटवे, मी घरात राहावे, की थंडीपावसात भिजून आयुष्य काढावे, याबद्दल तुला काही विचारले होते का ? नाही ना ? मग हा उपदेश तू मला का करतेस ? तुला हे वचन ठाऊक नाही का ?

वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छतश्च विशेषतः ।

प्रोक्तं श्रद्धाविहीनस्य अरण्यरुदितोपमम् ॥

(ज्याची आपल्यावर श्रद्धा असेल किंवा विशेषेकरून ज्याने विचारले असेल, त्यालाच सांगायला जावे. ज्याची आपल्यावर श्रद्धा नाही, त्याला उपदेश करू पाहणे हे अरण्यरुदनाप्रमाणे - म्हणजे अरण्यात रडण्याप्रमाणे निष्फळ असते.)

याप्रमाणे बोलून त्या वानराने रागाच्या भरात त्या चिमणीचे सुबक घरटे उद्‌ध्वस्त करून टाकले.

ही गोष्ट सांगून करटक पुढे म्हणाला, 'दमनका, तुला उपदेश करून मी एखादे दिवशी स्वतःवर तर संकट ओढवून घेणार नाही ना, असे भय आता मला वाटू लागले आहे. कारण तुझी वृत्तीच मूळची वाईट व स्वार्थी असल्यामुळे तुझ्या बुद्धीचा व विद्वत्तेचा उपयोग तू केवळ वाईट गोष्टीच करीत राहाण्यासाठी करणार. म्हटलेच आहे ना ?

किं करोत्येव पाण्डित्यमस्थाने विनियोजितम् ।

अन्धकारप्रतिच्छन्ने घटे दीप इवाहितः ॥

(पांडित्याचा नको तिथे उपयोग केल्याने पदरात काय पडणार ? ही गोष्ट अंधाराने वेढलेल्या - म्हणजे अपारदर्शक अशा - भांड्यात ठेवलेल्या दिव्यासारखीच निरर्थक ठरते.)

'तेव्हा हे दमनका, तू असले नसते उपद्‌व्याप करू नकोस, असे मी तुला आजवर अनेक वेळा सांगितले असतानाही तू माझे ऐकले नाहीस. स्वतःला इतरांपेक्षा विशेष शहाणे समजण्याची ही तुझी वृत्ती पाहिली की एका दिवट्या मुलाने शहाणपणाच्या धुंदीत स्वतःच्याच पित्यावर धुरात कोंडून, करपून जाण्याचा जो भयंकर प्रसंग आणला, त्याची आठवण होते.'

'ती गोष्ट काय आहे,' असे दमनकाने विचारताच करटक म्हणाला, 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel