* * * || लेख क्र ३ || * * *
भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ
प्रथम सगळे श्लोक पाहूया:
भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६
|| यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ||
|| तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: ||
भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६
|| दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ||
|| वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||
भगवद्गीता: अध्याय ७ श्लोक २१
|| यो यो यां यां तनु भक्त: श्रद्धायार्चीतुमीछति ||
|| तस्य तस्याचालाम श्रद्धां तामेव विदधम्यहम ||
भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २३
|| येSप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ||
|| तेSपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्
भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २५
|| यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ||
|| भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोSपि माम् ||
भगवद्गीता: अध्याय १० श्लोक २
|| न में विदू सुरगण: प्रभावं न महार्ष्य: ||
|| अहमार्दीर्ही देवानां महर्षी ना च सर्वश: ||
भगवद्गीता: अध्याय ११ श्लोक १५
अर्जुन उवाच:
|| पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ||
|| ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ||
एकत्रित भावार्थ:
छोट्या तळ्याद्वारे होऊ शकणाऱ्या सर्व कार्यांना मोठ्या जलाशयाद्वारे (समुद्र) सुद्धा पूर्ण केले जाऊ शकते पण समुद्राचे कार्य तळे करू शकत नाही. मग छोट्या तळ्याकडे का बरे जावे? त्याचप्रमाणे, सर्व वेद वाचून त्याप्रमाणे आचरण आणि कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ज्याला सर्व वेदांचे मूळ उद्देश आणि अंतिम ध्येये (मोक्ष) माहित आहेत ती व्यक्ती सर्व वेद जाणणाऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे.
म्हणजेच परम ईश्वर (श्रीकृष्ण) ज्याला जाणून घ्यायचा आहे त्याने इतर सगळ्या देव देवतांची भक्ती केलीच पाहिजे असे नाही कारण सगळे देव देवता आणि संपूर्ण ब्रम्हांडे शेवटी त्या अमूर्त आणि अथांग अशा परम ईश्वराचेच तर भाग आहेत आणि त्यातच शेवटी सामावले जातात. मग सरळ परम ईश्वराचीच भक्ती केली तर इतर देव देवतांची भक्ती केल्यासारखेच आहे आणि त्याहून सुद्धा अधिक बरेच काही आहे. परमेश्वर श्रीकृष्ण स्वत: (समुद्र) सांगत आहेत की कुणी मनुष्य एखाद्या देव देवतेची (तळे) भक्ती करत असेल तर त्या देवतेवर त्याची श्रद्धा मीच स्थिर करतो कारण ते देव देवता माझेच अंश आहेत. इतर देव देवता हे फक्त भौतिक जगातील भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नेमून दिलेले अधिकारी आहेत. (उदा: लक्ष्मी - पैसा; धन्वंतरी - आरोग्य; गणपती - बुद्धी वगैरे). ज्यांना स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे ते देव देवता यांची पूजा करतात. पण स्वर्गातील पुण्य भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा पृथ्वीवर मानव जन्म घेऊन यावेच लागते तसेच पाप करणारे नरक भोगून झाल्यावर पुन्हा प्राणी जन्म घेतात! म्हणजे कर्म आणि फळ यांची अनंत साखळी तयार होते. कर्म करणे आपल्या हातात असते पण त्याचे फळ कसे, केव्हा, कुठे, कोणत्या जन्मात आणि किती मिळेल हे भगवंतांच्या हातात असते. ही कर्म फळ साखळी कायमची तोडायची असेल (मोक्ष) तर गीतेत अनेक उपाय दिलेत. त्यापैकी दोन आहेत परमेश्वराची भक्ती आणि निष्काम कर्मयोग!
निष्काम कर्मयोग म्हणजे सध्याच्या मानव जन्मातील प्रत्येक चांगले कर्म फळाची अपेक्षा न करता (आणि फळ मिळाल्यास ते न स्वीकारता) परमेश्वराला अर्पण करत राहणे आणि मागील कर्मांचे बरे वाईट फळ भोगतांना तटस्थ वृत्तीने भोगणे!
पण परम ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय? मोक्ष! आणि मोक्ष म्हणजे काय? तर स्वर्ग-नरक आणि जन्म-मृत्यूच्या (विविध मानव प्राणी पक्षी जीव जंतू योनी) फेऱ्यातून सुटका होऊन आत्मा कायम शाश्वत परम ईश्वराच्या भगवदधामाकडे परतणे! मोक्ष हेच अंतिम ध्येय आहे, हे जो जाणतो तो फक्त त्या शाश्वत परमेश्वराची भक्ती करतो आणि असा माणूस इतर देव देवता यांची पूजा करत नसेल तरी तो देव देवता यांची पूजा करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. श्रीकृष्ण म्हणतात की, इतर देव देवतांची पूजा करणारे शेवटी अप्रत्यक्षरीत्या माझीच पूजा करतात पण ते त्रुटीयुक्त असते. तसे केल्याने भौतिक इच्छा पूर्ण होतात ज्या आणखी कर्म निर्माण करून जन्म मृत्यूचे फेरे वाढवतात जो वेदांचा मूळ उद्देश नाही. आपल्याला मोक्षाचा वृक्ष हवा आहे आणि सांगा बरे तुम्ही वृक्ष वाढण्यासाठी फांद्यांना (देव देवता) पाणी देता (पूजा करता) की वृक्षाच्या मुळांना (परमेश्वर भक्ती)?? देवांना आणि महर्षींना सुद्धा माझी उप्तत्ती माहिती नाही. माझे जन्म, कर्म आणि दिव्य स्वरूप अलौकिक आहे जे कुणी साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. कारण देव, महर्षी (ब्रम्हा विष्णू महेश आणि सर्व ब्रम्हांड) यांचे आदिकारण (स्रोत) मीच आहे.
(शेवटी विशिष्ट दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला विश्वरूप दर्शनामध्ये सर्व जगांतील सर्व देव देवता आणि ऋषी महर्षी तसेच सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे श्रीकृष्णांच्या आत विलीन होत असतांना दिसतात!)