रंगाला दुधगांव आवडलें. नदीकांठचा देखावा नयनमनोहर असे. आजुबाजूला वृक्षाच्छादित टेंकड्या होत्या. त्या जंगलांत मोर होते, वानर होते. रंगा कधीं कधीं एकटाच वनराजींत जाई आणि वनदेवतेचा जणुं बाळ होऊन तेथें बसे. त्याला कधीं भय वाटत नसे. तो नदीच्या डोहांत पोहायचा. त्यालां त्यावेळेस पंढरीची आठवण येई.

शाळेंत तो सर्वांचा आवडता झाला. चित्रकलेचे शिक्षक त्याच्यावर प्रेम करित. शाळेंत हस्तकौशल्याचें प्रदर्शन होते. मांडामांड करायला रंगानें मदत केली. प्रदर्शन बघायला गांवांतील बरीच मंडळी आली. रुपचंद म्हणून एक कलाप्रेमी सुखवस्तु मनुष्य गांवांत होता. रंगाचीं चित्रें त्याला फार आवडली. त्या चित्रांना त्यानें एक सुवर्णपदक दिलें. मोठ्या समारंभानें रुपचंदांच्या हस्तेंच रंगाला तें देण्यात आले. चित्रकलेच्या शेवटच्या परीक्षेला तो बसला नि पहिला आला. त्याला अनेक बक्षिसें मिळालीं. आई दिवाळींत आली नाही. रंगाच्या आईला नयना आपल्या घरीं घेऊन गेली. काशीताईंना तिनें सज्जनगड, माहुली, मेरुलिंग, धावडशी सारें दाखविलें.

''रंगाला हें सारें पाहून किती आनंद झाला असता ?'' काशीताई म्हणाल्या.

''उन्हाळ्याच्या सुट्टींत त्या सर्वांनाच आपण बोलावूं. आपण महाबळेश्वराला जाऊं. बाबा दरवर्षी तेथें बंगला घेतात.''

''पुढचें कोणी पाहिलें आहे. तो दिवाळीत माझ्या आशेनें होता.''

''परंतु मी तुम्हांला आणलें. काशीताई, मला आई नाहीं. तुम्ही माझीं धुणी धुतां. परंतु मी तुमच्याकडे निराळ्या दृष्टीनें बघतें. मला तुम्ही जवळच्या वाटतां. माझ्या आजारीपणांत तुम्ही माझें आंग चेपीत होतां. मला आईचे जणूं हात वाटले.''

''मी आलें म्हणून तुला बरें वाटलें ना ?''
''हो. मुलाला सोडुन तुम्ही माझा हट्ट पुरवलात. किती तुमचें उदार मन ? आणि काशीताई, बाबांना रंगाचीं चित्रें आवडलीं. ते मला म्हणाले 'तुझ्या चित्रांत सहजता नाहीं. हा मुलगा जन्मजात चित्रकार आहे. त्यांनें दोन रेघा ओढल्या तरी त्यांत सुंदरता असेल ! मी चित्रकलेची प्रयत्नशील उपासना करणारी आहं. तुमचा रंगा सहजभक्त आहे. जणूं तो मुर्तिमंत चित्रकला आहे. त्याचीं बोटें मी पहात असें. कशीं लांब सरळ आहेत. वर निमुळतीं होत गेलेलीं.''

''रंगावर सर्वांचे प्रेम आहे.''
''काशीताई, त्याचे रंगा नांव कसें ठेवलेंत ? तुम्हांला का आधीं स्वप्न पडलें ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel