श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥

जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा ।

विश्वीं विश्वात्मा ये सद्भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥१॥

ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी ।

तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥२॥

त्या चरनारविंदकृपादृष्टी । अहं सोहं सुटल्या गांठी ।

एकसरें तुझ्या पोटीं । उठाउठी प्रवेशलों ॥३॥

यालागीं तूं निजात्ममाये । या हेतू जंव पाहों जायें ।

तंव बापपण तुजमाजीं आहे । अभिनव काये सांगावें ॥४॥

येथ मातापिता दोनी । वेगळीं असती जनीं ।

ते दोनी एक करोनी । एका जनार्दनीं निजतान्हें ॥५॥

आतां उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा ।

परी नित्य नवा सोहळा । संभ्रम आगळा निजबोधाचा ॥६॥

शिव शक्ति गणेशु । विश्व विष्णु चंडांशु ।

ऐसा अलंकार बहुवसु । निजविलासु लेवविशी ॥७॥

यापरी मज निजबाळा । लेणीं लेवविशी स्वलीळा ।

आणि लेइलेपणाचा सोहळा । पहाशी वेळोवेळां कृपादृष्टीं ॥८॥

बाळका लेवविजे लेणें । तयाचें सुख तें काय जाणे ।

तो सोहळा मातेनें भोगणें । तेवीं जनार्दनें भोगिजे सुख ॥९॥

आपुल्या चिद्रत्‍नांच्या गांठी । आवडी घालिशी माझ्या कंठीं ।

यालागीं मज पाठोवाठीं । निजात्मदृष्टीं सवें धांवे ॥१०॥

समर्थ जयाचा जनकु । त्यास मानिती सकळ लोकु ।

एका जनार्दनीं एकु । अमान्य अधिकु मान्य कीजे ॥११॥

बाळक स्वयें बोलों नेणे । त्यासी माता शिकवी वचनें ।

तैशीं ग्रंथकथाकथनें । स्वयें जनार्दनें बोलविजे ॥१२॥

तेणें नवल केलें येथ । मूर्खाहातीं श्रीभागवत ।

शेखीं बोलविलें प्राकृत । एकादशार्थ देशभाषा ॥१३॥

परिसोनि प्रथम अध्यावो । उगाचि राहिला कुरुरावो ।

पुढें कथाकथनीं ठावो । कांहीं अभिप्रावो दिसेना ॥१४॥

आपण करावा प्रश्न । तंव हा सांगेल कृष्णनिधन ।

यालागीं राजा मौन । ठेला धरुन निवांत ॥१५॥

जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलत जाहला शुकदेवो ।

तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिति ॥१६॥

हा एकादश अलोकिक । श्लोकाहून श्लोक अधिक ।

पदोपदीं मुक्तिसुख । लगटलें देख निजसाधकां ॥१७॥

ऐसें ऐकतांचि वचन । राजा जाहला सावधान ।

मुक्तिसुखीं आवडी गहन । अवधानें कान सर्वांग केले ॥१८॥

ऐसें देखोन परीक्षिती । शुक सुखावे अत्यंत चित्तीं ।

तो म्हणे अवधानमूर्ती । ऐक निश्चितीं गुह्य ज्ञान ॥१९॥

द्वितीयाध्यायीं निरुपण । नारद-वसुदेवसंवाद जाण ।

निमिजायंतांचे प्रश्न । मुख्य लक्षण भागवतधर्म ॥२०॥;

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel