श्रीशुक उवाच-गोविन्दभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वह ।

अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ॥१॥

जो मुक्तांमाजीं अग्रणी । जो ब्रह्मचारियां शिरोमणी ।

योगी वंदिती मुकुटस्थानीं । जो भक्तमंडणीं अतिश्रेष्ठ ॥२१॥

जो ब्रह्मरसाचा समुद्र । जो निजबोधाचा पूर्णचंद्र ।

तो बोलता झाला शुक योगींद्र । श्रोता नरेंद्र कुरुवंशींचा ॥२२॥;

तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु । आणि माझाही परमगुरु ।

नारद महामुनीश्वरु । त्यासी अतिआदरु श्रीकृष्णभजनीं ॥२३॥

द्वारकेहूनि स्वयें श्रीकृष्ण । पिंडारका पाठवी मुनिगण ।

तेथूनि नारद आपण । द्वारकेसी जाण पुनः पुनः येतु ॥२४॥

हो कां जे द्वारकेआंत । न रिघे भय काळकृत ।

जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ । असे नांदत निजसामर्थ्यें ॥२५॥

दक्षशापु नारदासी पाहीं । मुहूर्त राहों नये एके ठायीं ।

तो शापु हरिकीर्तनीं नाहीं । यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु ॥२६॥

ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती । तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती ।

तेथें शापबाधेची न चले प्राप्ती । यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें ॥२७॥;

नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान । त्यासी कां कृष्णमूर्तीचें ध्यान ।

श्रीकृष्णदेहो चैतन्यघन । यालागीं श्रीकृष्णभजन नारदा पढियें ॥२८॥

यापरी कृष्णभजन । मुक्तांसी पढियें पूर्ण ।

त्यासी न भजे अभागी कोण । तेंचि निरुपण शुक सांगे ॥२९॥

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel