त्रिभुवनविभवहतवऽप्यकुण्ठस्मृतिरजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् ।

न चलति भगवत्पदारविन्दाल्लवनिमिषार्धमपि यः स वष्णवाग्‍र्यः ॥५३॥

सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणीं ठेविली चित्तवृत्ती ।

निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीतीं निजनिष्ठा ॥४५॥

तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरुं प्रार्थिती ।

तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी ॥४६॥

क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभुवनविभव ये हाता ।

एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥४७॥

हरिचरणीं अपरोक्षस्थिती । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती ।

त्यापुढें त्रिभुवनविभवसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥४८॥;

सकळ जगाचा स्त्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां ।

त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्तुतां अंगणीं ज्याचे ॥४९॥

त्रिभुवनवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता ।

तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिंवसिता हरिचरण ॥७५०॥

त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं ।

अहर्निशीं हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥५१॥

सहसा न पवे हरिचरण । यालागीं ब्रह्मा साभिमान ।

तेणें अभिमानेंचि जाण । नेलीं चोरुन गोपाल-वत्सें ॥५२॥

तेथें न कष्टतां आपण । न मोडतां कृष्णपण ।

गोपाल-वत्सें जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ॥५३॥

अगाध हरिलीला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण ।

तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥५४॥

कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं ।

तोही निजराज्य सांडोनी । महाश्मशानीं हरिचरण चिंती ॥५५॥

कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं ।

हरिचरण हृदयामाझारीं । शिव निरंतरीं चिंतीत ॥५६॥

एवं ब्रह्मा आणि शंकर । चरणांचे न पवती पार ।

तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥५७॥;

हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती ।

भक्त ओंवाळूनि सांडिती । जाण निश्चितीं निंबलोण ॥५८॥

हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी ।

तैं त्रैलोक्यवैभवाच्या कोडी । करी कुरवंडि निजभक्त भावें ॥५९॥

एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाहीं येथें ।

यालागीं चित्तें वित्तें जीवितें । जडले सुनिश्चितें चरणारविंदीं ॥७६०॥

निमिषार्ध त्रुटी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण ।

ते वैष्णवांमाजीं अग्रगण । राया ते जाण ’उत्तम भक्त’ ॥६१॥

जे त्रिभुवनविभवभोग भोगिती । तेही पावले अनुतापवृत्ती ।

त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥६२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel