सत्वं रजस्तम इति त्रिवृदेकमादौ, सूत्रं महानहमिति प्रवदन्ति जीवम् ।

ज्ञानक्रियार्थफलरूपतयोरुशक्ति, ब्रह्मैव भाति सदसच्च तयोः परं यत् ॥३७॥

ब्रह्मनिज‍ऐक्यपरिपाटी । प्रपंचु ब्रह्मत्वेंचि उठी ।

संतासंत सकळ सृष्टी । देखती दृष्टीं ब्रह्मरूप ॥६९१॥

जेवीं नभीं नीळिमेचें भान । तेवीं ब्रह्मीं माया नांदे संपूर्ण ।

नवल तियेचें विंदान । नपुंसका जाण पुरुषत्व केलें ॥६९२॥

अगाध तिचा पतिव्रताधर्म । नपुंसकीं उपजवी काम ।

अनाम्या ठेवी नाम । कीं निष्कर्मा कर्म तिचेनी ॥६९३॥

ते निःसंगसंगा रातली । स्पर्शेंवीण गुर्विणी झाली ।

प्रधान-महत्तत्त्वें गर्भा आली । तेथ त्रिगुणातें व्याली विकारयुक्त ॥६९४॥

विद्या‍अविद्या निजस्वभावीं । जीवशिवांची भेदपदवी ।

प्रिया पुरुषातें भोगवी । ज्ञाना-ज्ञानगांवीं वसोनियां ॥६९५॥

जेवीं सुवर्णीं अलंकार । तंतूमाजीं पटाकार ।

भिंतीवरी भासे चित्र । तेवीं माया साकार ब्रह्मीं भासे ॥६९६॥

मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नाना नामाकारीं जरी पूजिलीं ।

तरी मृत्तिकाचि संचली । तेवीं ब्रह्मीं भासली जगद्रूपें माया ॥६९७॥

जैशा घृताच्या कणिका । घृतेंसीं नव्हतीं आणिका ।

तेवी ब्रह्मीं मायाशक्ति देखा । दावी अनेका अर्थांतें ॥६९८॥

ब्रह्म पूर्वीं एकाकी एक । तेंचि केवीं झालें अनेक ।

तो मायायोगपरिपाक । विशद अर्थ देख पिप्पलायनु सांगे ॥६९९॥

मुळीं मुख्य ब्रह्म ’ओंकार । तें एकचि झालें त्रिप्रकार ।

आकार-उकार-मकार । सत्त्वादि विकार गुणत्रयात्मक ॥७००॥

गुणत्रय समसमान । त्या नांव बोलिजे ’प्रधान’ ।

तेंचि क्रियाशक्तिसूत्र जाण । तेथें प्रगटल्या ज्ञान ’महत्तत्त्व ’ म्हणती ॥७०१॥

’अहंब्रह्म’ हे पूर्णस्फूर्ति । तें ’अहं’ आलें देहाकृती ।

देहाभिमानें निश्चितीं । ’जीव’ म्हणती वस्तूतें ॥७०२॥

’क्रिय’ म्हणिजे दशधा करणें । ’ज्ञान’ शब्दें देवताधिष्ठानें ।

’अर्थ’ ऐसें विषयांसी म्हणणें । तेथ ’फळ’ जाणणें सुखदुःख ॥७०३॥

गुण-भूतें-विषय-करणें । जीव भोक्ता सुखदुःखपणें ।

ज्ञान क्रिया कर्माचरणें । हें सर्वही जाणणें पूर्ण ब्रह्म ॥७०४॥

साखरेचा फणस प्रबळ । तेथें कांटे त्वचा बीजगोळ ।

अवघी साखरचि केवळ । तेवीं ब्रह्मचि सकळ जगदाकारें ॥७०५॥

जेवीं पाटा‍ऊ पुतळीकृत । तेथ विषमावयवीं समान सूत ।

तेवीं जगदाकारें आकारवंत । दिसे अविकृत परब्रह्म ॥७०६॥

’जग-विश्व-प्रपंच’ नाम । परी ते निखळ परब्रह्म ।

हा उपनिषदार्थ उत्तम । वेदांतीं परम परमार्थु तो हा ॥७०७॥

जगदाकारें ब्रह्म निश्चित । जग अवघें विकारवंत ।

तैं ब्रह्मासही विकार प्राप्त । म्हणती तो अर्थ न घडे राया ॥७०८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel