चमस उवाच-मुखबाहूरुपादेभ्यः पुरुषस्याश्रमैः सह ।

चत्वारो जज्ञिरे वर्णा गुणैर्विप्रादयः पृथक् ॥२॥

जो कां जगाचा जनकु । मुख्य गुरुत्वें तोचि एकु ।

त्यासी न भजे जो अविवेकु । तो नाडला लोकु सर्वस्वें ॥४४॥

पुरुषापासूनि जन्मले जाण । चार्‍ही आश्रम चार्‍ही वर्ण ।

त्यांचे उत्पत्तीचें स्थान । ऐक संपूर्ण नृपनाथा ॥४५॥

मुखीं वेदविद ब्राह्मण । बाहूं जन्मले राजन्य ।

उरूं जन्मले वैश्यवर्ण । चरणीं जन्मस्थान शूद्रवर्णा ॥४६॥

मूळीं अवघे तीन गुण । गुणयोगें वर्ण जाण ।

त्रिगुणीं चारी वर्ण । जन्मलक्षण घडे कैसें ॥४७॥

सत्त्वगुणें शुद्ध ब्राह्मण । सत्त्वरजमिश्रें राजे जाण ।

रजतमें वैश्यवर्ण । केवळ तमोगुण शूद्रवर्ण ॥४८॥

क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण । द्विजन्मे हे तिन्ही वर्ण ।

त्यांसी गायत्री वेदाध्ययन । शूद्र ते जाण संस्काररहित ॥४९॥

ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य । तिहीं वर्णां अवश्य प्राप्त ।

चहूं आश्रमां आश्रयभूत । जाण निश्र्चित ब्राह्मण ॥५०॥

गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणीं । ब्रह्मचर्य हृदयस्थानीं ।

वक्षःस्थळीं वसती वनी । शिरोमणी संन्यास ॥५१॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel