दूरे हरिकथाः केचिद्दूरे चाच्युतकीर्तनाः ।

स्त्रियः शूद्रादयश्चैव तेऽनुकम्प्या भवादृशाम् ॥४॥

एका पित्याचे दोघे अर्भक । एक प्रबुद्ध एक बाळक ।

पित्यासी अवमानितां देख । ताडी जनक प्रबुद्धासी ॥६४॥

बाळक पित्याचे माथां चढे । जरी लाता हाणे तयाकडे ।

तरी त्यासी दोषु न घडे । दोषांचें सांकडें सज्ञानासी ॥६५॥

ज्ञात्यांपासोनि भजन ठाके । ते कवळिजती महादोखें ।

अज्ञानें तरती भाविकें । साधुकृपामुखें अनुगृहीतां ॥६६॥

अज्ञाना नाहीं विशेष बाधु । तो साधुविश्र्वासें होय शुद्धु ।

ज्ञानाभिमानियां भाव विरुद्धु । यालागीं सुबुद्धु दोष बाधी ॥६७॥

अज्ञानी विश्र्वासें साधु वंदी । ज्ञानाभिमानी दोहोंतें निंदी ।

यालागीं त्यातें त्रिशुध्दी । अवश्य बाधी अतिदोष ॥६८॥

साधुविश्र्वासें अज्ञान फिटे । ज्ञानाभिमानियां विकल्प मोठे ।

त्यांसी विश्र्वास कदा न घटे । अभिमानहटें अधःपात ॥६९॥

एवं विचारितां नेटेंपाटें । अहंतेचें बंधन मोठें ।

अभिमानाऐसें नाहीं खोटें । दुजें वोखटें त्रिलोकीं ॥७०॥

अभिमानु ईश्र्वरा बाधी । तोहो शबळ कीजे सोपाधी ।

अभिमानें देहबुद्धी । बाधक त्रिशुद्धी सुरनरांसी ॥७१॥

यालागीं जे अज्ञान जन । ज्यांसी नाहीं ज्ञानाभिमान ।

तेही विश्र्वासल्या संपूर्ण । साधु सज्जन अनुग्रहो करिती ॥७२॥

ज्यासी म्हणती नीच वर्ण । स्त्रीशूद्रादि हीन जन ।

ज्यासी कां दूरी शास्त्रश्रवण । ज्यासी दूरी श्रवण वेदोक्त ॥७३॥

त्यांसी जाहलिया सद्भाव संपूर्ण । ते होतु कां हीन जन ।

परी संतकृपेसी आयतन । विश्र्वासें पूर्ण अधिकार झाला ॥७४॥

ऐसे पूर्ण भावार्थी । त्यांसी तुम्हांऐशा साधुसंतीं ।

अनुग्रहोनि तारिती । कृपामूर्ती कृपाळु ॥७५॥

अज्ञानी यापरी तरती । परी ज्ञानाभिमान ज्यांच्या मतीं ।

ते ब्रह्मादिकां न तरती । त्यांचीही स्थिति मुनि सांगे ॥७६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel