कृतादिषु प्रजा राजन्‌, कलाविच्छन्ति संभवम् ।

कलौ खलु भविष्यन्ति, नारायणपरायणाः ॥३८॥

कीर्तनासाठीं चारी मुक्ति । हेचि कलियुगीं मुख्य भक्ति ।

यालागीं इंद्रादि देवपंक्ति । जन्म इच्छिती कलियुगीं ॥४१॥

स्वर्ग नव्हे भोगस्थान । हें विषयाचें बंदिखान ।

कलियुगीं सभाग्य जन । जन्मोनि कीर्तन हरीचें करिती ॥४२॥

जेथींच्या जन्मा देव सकाम । तेथ कृतादि युगींचे उत्तमोत्तम ।

प्रजा अवश्य वांछिती जन्म । कीर्तनधर्म निजभजना ॥४३॥

कृतयुगींचे सभाग्य जन । यागीं पावले स्वर्गस्थान ।

तेही कलियुगींचें जाण । जन्म आपण वांछिती ॥४४॥

कृत त्रेत आणि द्वापर । तेथीलही मुख्य नर ।

कलियुगीं जन्म तत्पर । निरंतर वांछिती ॥४५॥

तैंचे लोक करिती गोष्टी । चारी पुरुषार्थ कीर्तनासाठीं ।

कलियुगीं हे महिमा मोठी । धन्य धन्य सृष्टीं कलियुग ॥४६॥

जे असती धन्यभागी । ते जन्म पावती कलियुगीं ।

ऐसें कलीच्या जन्मालागीं । नर-सुर-उरगीं उत्कंठा ॥४७॥

तरावया दीन जन । कलीमाजीं श्रीनारायाण ।

नामें छेदी भवबंधन । तारी हरिकीर्तन सकळांसी ॥४८॥

यालागीं कलिमाजीं पाहीं । श्रद्धा हरिकीर्तनाच्या ठायीं ।

जन तरती सुखोपायीं । संदेहो नाहीं नृपनाथा ॥४९॥

कलियुगीं बहुसाल नर । होतील नारायणीं तत्पर ।

भक्तीचें भोज विचित्र । स्त्रीशूद्र माजविती ॥४५०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel