शुद्धिर्नृणां न तु तथेड्य दुराशयानां । विद्याश्रुताध्ययनदानतपःक्रियाभिः ।
सत्त्वात्मनामृषभ ते यशसि प्रवृद्ध । सच्छ्रद्धया श्रवणसम्भृतया यथा स्यात् ॥९॥
कृष्णस्तवनें स्तविता तरे । श्रवणद्वारें ऐकता उद्धरे ।
यालागीं स्तव्य तूंचि निर्धारे । स्तवनद्वारें तारकु ॥८८॥
एवं तुझे कीर्तीचें श्रवण । तेंचि परम शुद्धीसी कारण ।
यावेगळें जें साधन । तें केवळ जाण प्रयास ॥८९॥
ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची उत्कंठा ।
अंतरीं पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा करी वृत्ती ॥९०॥
तुझ्या श्रवणीं होऊनि उदास । तपें तपतां तापस ।
नाना साधनीं कर्कश । जाहल्या निरस मती त्यांच्या ॥९१॥
'मंत्रविद्याग्रहण' । विकळ उच्चारितां वर्ण ।
शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अंगीं वाजे ॥९२॥
करितां 'शास्त्रश्रवण' । चौगुणां गर्व चढे पूर्ण ।
तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण चतुर्मुखा ॥९३॥
करितां 'वेदाध्ययन' । विस्वर गेलिया उच्चारण ।
शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुराऐसें ॥९४॥
'दान' देतां नृग बहुवस । कृपीं जाला कृकलास ।
प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा ॥९५॥
'तप' करितां ऋष्यशृंगारासी । तो वश जाहला वेश्यांसी ।
श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी आणिकांसी पैं नाहीं ॥९६॥
'कर्म' करावें यथानिगुती । तंव त्या कर्माची गहन गती ।
प्राचीनबर्ह्याची कर्मस्थिती । नारदोक्तीं सांडविली ॥९७॥
कर्मीं आचमन करावें । तेथ माषामात्र जळ घ्यावें ।
न्यूनाधिकत्वासवें । दोष पावे सुरापानसम ॥९८॥
एवं दुष्टहृद्य ज्यासी । तपादिक साधनें त्यासी ।
शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें कीर्तीसी नायकतां ॥९९॥
श्रवणें परीक्षिती तरला । श्रवणें क्रौंच उद्धरिला ।
मकरोदरीं श्रवण पावला । सिद्ध जाहला मत्स्येंद्र ॥१००॥
तुझें श्रवण दोपरी । एक तें चित्तशुद्धी करी ।
दुसरें जीवब्रह्मऐक्य करी । दोंहीपरी उद्धारु ॥१॥
प्रत्यक्ष पाहतां वाराणसी । श्रवणीं तारक ब्रह्म उपदेशी ।
मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणें जीवासी उद्धारु ॥२॥
तूं अवाप्तसकळकाम । निष्कामाचें निजधाम ।
ऐशिया तुज करणें कर्म । भक्तभ्रम छेदावया ॥३॥
नाना चरित्रांची करणी । करिता झालासी चक्रपाणी ।
मोक्षमार्गाची निजश्रेणी । दिधली रचूनि जनासी ॥४॥
चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तिश्रवण ।
येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण साधनें ॥५॥
अपेक्षा जें जें साधन साधिलें । तें तें अपेक्षेनेंचि फोल केलें ।
निरपेक्षाचें हृदय भलें । वेगीं गेलें परमार्थीं ॥६॥
हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मबीजें अंकुरला ।
श्रद्धेचा वेल उगवला । कोंभ निघाला तरितरितु ॥७॥
सच्छ्रवणप्रबळजळें । रुतलीं वैराग्यदृढमूळें ।
वेगीं गेलीं निजबळें । श्रद्धामेळें चिदाकाशीं ॥८॥
ते चिदाकाशींचा चंद्रमा । स्वप्रकाश तूं पुरुषोत्तमा ।
साधक शिणती मेघश्यामा । तुझी प्रतिमा पहावया ॥९॥
त्यां तुझे श्रीचरण । प्रत्यक्ष जाहलें दर्शन ।
घालोनियां लोटांगण । चरणस्तवन करिताती ॥११०॥