प्राणवृत्त्यैव सन्तूष्येन्मुनिर्नैवेन्द्रियप्रियैः ।

ज्ञानं यथा न नश्येत नावकीर्येत वाङ्मनः ॥३९॥

प्राणाचियेपरी । जो विषयीं आसक्ती न धरी ।

विषय सेविलियाही वरी । नव्हे अहंकारी प्राणु जैसा ॥८॥

प्राणाभ्यासें क्षुधा अद्‍भुत । तेव्हां प्राणासीच क्षोभ येत ।

तेणें काया वाचा चित्त । विकळ पडत इंद्रियें ॥९॥

तया प्राणासी आधारू । भलतैसा मिळो आहारु ।

परी धडगोडांचा विचारु । न करी साचारू पैं प्राणु ॥४१०॥

तैसाचि योगिया पाहीं । तो अभिमान न धरी देहीं ।

विषयो सेवी परी कांही । आसक्ति नाहीं तयासी ॥११॥

क्षुधेचिया तोंडा । मिळे कोंडा अथवा मांडा ।

परी रसनेचा पांगडा । न करी धडफुडा तयासी ॥१२॥

ज्ञानधारणा न ढळे । इंद्रियें नव्हती विकळें ।

तैसा आहार युक्तिबळें । सेविजे केवळें निजधैर्यें ॥१३॥

प्राणास्तव इंद्रियें सबळें । प्राणायोंगें देह चळे ।

त्या देहकर्मा प्राणु नातळे । अलिप्त मेळें वर्ततू ॥१४॥

त्या प्राणाची ऐसी स्थिती । योगियाची वर्तती वृत्ती ।

सर्व करूनि न करी आसक्ती । देहस्थिति नातळे ॥१५॥

ब्रह्मादिकांचा देह पाळूं । कां सूकरादिकांचा देह टाळूं ।

ऐसा न मानीच विटाळू । प्राणु कृपाळू समभावें ॥१६॥

तैसेंचि योगियाचें कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म ।

कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावें ॥१७॥

आवडीं प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो ।

ऐसा प्राणासी नाहीं भावो । शुद्ध समभावो सर्वत्र ॥१८॥

प्राण अपान समान उदान । सर्व संधी वसे व्यान ।

इतूकीं नामें स्थानें पावोनि जाण । न सांडी प्राण एकपणा ॥१९॥

तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण ।

देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडी ॥४२०॥

प्राणु असोनि देहाभीतरीं । बाह्य वायूसी भेद न धरी ।

तैशी योगिया भावना करी । बाह्यभ्यंतरीं ऐक्यता ॥२१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel