बहवो मत्पदं प्राप्तास्त्वाष्ट्रकायाधवादयः ।
वृषपर्वा बलिर्बाणो मयश्चाथ विभीषणः ॥५॥
सुग्रीवो हनुमानृक्षो गजो गृध्रो वणिक्पथः ।
व्याधः कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्न्यस्तथापरे ॥६॥
वृत्रासुर गाइजे वेदीं । जो इंद्रासी मिसळला युद्धीं ।
युद्धींही अविरुद्ध बुद्धी । माझे निजपदीं पावला ॥७४॥
ऐकतां नारदाच्या गोठी । गर्भींच मजसी घातली मिठी ।
जो जन्मला कयाधूच्या पोटीं । भक्तजगजेठी प्रल्हादु ॥७५॥
वृषपर्वा दैत्य उद्भटू । माझे पदीं झाला प्रविष्टू ।
बळीच्या द्वारी मी खुजटू । झालों बटू भिकेसी ॥७६॥
छळें करितां बळिबंधन । छळितां मी छळिलों जाण ।
अंगा आलें द्वारपाळपण । बळीआधीन मी झालों ॥७७॥
त्या बळीचा पुत्र बाणासुर । शिववरें मातला थोर ।
माझे पुत्राचा चोरिला पुत्र । दोहींचा हेर नारदू ॥७८॥
तो म्यां साधूनि धरिला चोरू । बाणीं केला अतिजर्जरू ।
छेदिला सहस्त्र भुजांचा भारू । शिव जीवें मारूं नेदीच ॥७९॥
तो म्हणे भक्तपुत्र तू झणीं मारीं । मजही बळीची भीड भारी ।
अखंड मी असें त्याच्या द्वारी । यालागीं उद्धरीं बाणातें ॥८०॥
मग संबोखावया शिवातें । बाण आपुले निजहस्तें ।
ऐक्यें शिवपदीं स्थापिलें त्यातें । कल्याणातें पावला ॥८१॥
खांडववन अग्नीसी । अर्जुनें दीधलें खावयासी ।
तेथें जळतां मयासुरासी । म्यांचि तयासी उद्धरिलें ॥८२॥
राक्षसकुळीं जन्मला जाण । शत्रूचा बंधू बिभीषण ।
माझ्या ठायीं अनन्यशरण । जीवप्राण तो माझा ॥८३॥
सुग्रीव हनुमंत जांबवंतू । यांचा पवाडा विख्यातू ।
जडायु उद्धरिला वनांतू । जो रावणें खस्तू केला होता ॥८४॥
गज सरोवरीं ग्राहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिला जीत ।
तो अंतकाळीं मातें स्मरत । आर्तभूत अतिस्तवनें ॥८५॥
सांडूनि समस्तांची आस । पाहोनि वैकुंठाची वास ।
राजीव उचलूनि राजस । पाव परेश म्हणे वेगीं ॥८६॥
त्या गजेंद्राचे तांतडी । वैकुंठींहूनि लवडसवडी ।
म्यां गरुडापुढें घालोनि उडी । बंधन तोडीं गजाचे ॥८७॥
त्यासी पशुयोनीं जन्म होतें । परी तो अंतीं स्मरला मातें ।
पावला माझ्या निजधामातें । गाइजे त्यातें पुराणीं ॥८८॥
वैश्य तुळाधार वाणी । सत्य वाचा सत्य जोखणी ।
सत्यें पावला मजलगुनी । सत्यतोलणी त्याचें नांव ॥८९॥
अंत्यजांमाजीं धर्मव्याध । माझें पावला निजपद ।
जराव्याध गा प्रसिद्ध । करोनि अपराध उद्धरिला ॥९०॥
चरणीं विंधोनियां बाण । घायें घेतला माझा प्राण ।
तो परीक्षिति जराव्याध जाण । कृष्णें आपण तारिला ॥९१॥
कौलिकांमाजीं गुहक देख । आला श्रीरामासंमुख ।
कर्म निरसलें निःशेख । निजधाम देख पावला ॥९२॥
कुब्जा तीं ठायीं वांकुडी । नीट निजभावें चोखडी ।
तिच्या चंदनाची शुद्ध गोडी । अति आवडी मजलागीं ॥९३॥
तिने चर्चूनियां चंदन । मन केलें मदर्पण ।
मी झालों तिजआधीन । निजधाम ते जाण पावली ॥९४॥
गोकुळींचिया गोपिका । संसारासी होऊनि विमुखा ।
तनमनप्राणें मजलागीं देखा । भाळोनि निजसुखा पावल्या ॥९५॥
माझी गोपिकांसी परम आवडी । कीं मजचि गोपिकांची गोडी ।
पाहतां यांचे समान पाडीं । जाहलीं बापुडीं साधनें ॥९६॥
सांडूनि संसाराची चाड । न धरूनि पतिपुत्रांची भीड ।
यज्ञपत्न्यांसी माझें कोड । भावार्थें दृढ भाविकां ॥९७॥
तिंहीं मज अर्पोनियां अन्न । माझें निजधाम पावल्या जाण ।
मज न पावतीच ते ब्राह्मण । जयांसी कर्माभिमान कर्माचा ॥९८॥
एक ब्राह्मण अतिशास्त्रबळें । पत्नीसी येवूं नेदी मजजवळें ।
तुम्ही वेदशास्त्रांही वेगळे । गोरक्ष गोंवळे केवीं पूजा ॥९९॥
येरी समस्तां जातां देखोन । तिचें मजलागीं तळमळी मन ।
अति कर्मठ तो ब्राह्मण कठिण । अवरोधूनि राखिली ॥१००॥
पित्यानें लाविलीसी माझ्या हातीं । तेव्हांच मी तुझ्या देहाचा पती ।
मज सांडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी ॥१॥
येरी म्हणे तूं या देहाचा पती । तो देह ठेवूनियां तयाप्रती ।
जीवित्वे मीनलिया मजप्रती । सायुज्य मुक्ति पावली ॥२॥
ज्या माझिया प्राप्तीसी । साधक शिणती नाना सायासीं ।
तीं साधनें न करितां त्यांसी । अनायासीं मज पावल्या ॥३॥