सात्त्विकान्येव सेवेत पुमान् सत्त्वविवृद्धये ।
ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिरपोहनम् ॥६॥
सात्त्विक द्रव्यें सेवितां । सत्त्ववृद्धी होय तत्त्वतां ।
सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥
धर्मप्रवृत्ति माझें भजन । माझ्या भक्तिउल्हासें जाण ।
भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥
तत्त्वमस्यादि वाक्यव्युत्पत्ती । ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती ।
तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥
ऐसा विकल्प जरी तूं धरिसी । उद्धवा ऐक त्याही विचारासी ।
यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥
केवळ सत्त्वशुद्धीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण ।
तें पां हाटगाण्याऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥
आंधळें उपजलें जे कुशीं । स्तनपान करी अहर्निशीं ।
परी तें न देखे माउलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥
इंद्रियें सचेतनमेळीं । भगवंत सर्वांतें प्रतिपाळी ।
त्यातें न देखती विषयांधळीं । अतिअंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥
अजागळां लोंबते जाण । मिथ्या भाषण म्हणती ते स्तन ।
त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥
वाहते उदकीं लिहले लेख । तळीं अक्षर नुमटे एक ।
तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥
झाल्या आपादतां सत्त्वशुद्धी । जंव प्रकटेना धर्मबुद्धी ।
तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥
ऐकतां हरिकथाश्रवण । बाष्प रोमांच स्वेद रुदन ।
रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥
हृदयींचा लोभ जंव न तुटे । तंव निश्चयज्ञान कैंचे भेटे ।
सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥
ते चालतां धर्मपंथीं । जै माझी भक्ति होय सांगाती ।
तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥
ते भक्तीचा सांडितां सांगातू । पुढील अनोळख महापंथू ।
तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्पआवर्तू बुडविती ॥७४॥
भाग्येंवीण माझी भक्ती । प्राण्यासी नव्हे गा सांगाती ।
जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥
माझे भक्तीसवें महाशूर । नांवाणिगे नवविध वीर ।
सत्रदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥
यालागीं माझे भक्तीविण । सहस्त्रधा केल्या श्रवण मनन ।
माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥
सर्व भूतीं भगवद्भावो । या नांव मुख्यभक्ति पहा हो ।
ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥
साक्षेपें नेऊनि घागरी । पालथी घातल्या गंगासागरीं ।
जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥
यालागीं अत्यादरेंसीं जाण । धर्मयुक्त माझें भजन ।
करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥
लोभ ठेऊनि अर्थस्वार्थीं । कोरडी करितां माझी भक्ती ।
मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥
जो धनें मनें काया वचनें । वेंचूनि भजे मजकारणें ।
त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥
व्याली धेनु वत्सा वोरसे । तेवीं मी तुष्टें अतिसंतोषें ।
तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्भक्तां ॥८३॥
सगुण सुंदर आणि पतिव्रता । अतिशयें पढियंती होय कांता ।
तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्भक्तां प्रसन्न ॥८४॥
माझेनि प्रसादें प्रकाशे ज्ञान । श्रुति स्मृती नांव म्हणती जाण ।
सविलास अविद्यानिरसन । 'अपोहन' या नांव ॥८५॥
गुणास्तव देह जाण । देहास्तव उपजे ज्ञान ।
तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥
हे गोष्टी तूं म्हणसी कुडी । कीं पक्षी आपुले पांख मोडी ।
नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥
हें न घडतें जैं घडों बैसे । तैं देहींचेनि ज्ञानें गुणदेह नासे ।
हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.