मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेऽन्यैरपीन्द्रियैः ।

अहमेव न मत्तोऽन्यद् इति बुध्यध्वमञ्जसा ॥२४॥

मजवेगळा तिळाइतुका । रिता ठावो नाहीं देखा ।

तेथ व्याप्य आणि व्यापका । अभिन्नत्व देखा सहजचि ॥३४॥

मनाच्या संकल्पा आलें जें जाण । त्यासी शाब्दिक म्हणती भिन्न ।

माझ्या स्वरूपाचा विवर्त तें मन । हे अभिन्न खूण कळेना ॥३५॥

मन लक्षितां सावधान । सर्वथा लक्षेना तें जाण ।

परब्रह्मही अलक्ष्य पूर्ण । दोनी समान चिद्‌रूपें ॥३६॥

शिंपीच्या अंगीं रुपें आभासे । तेंचि तेथें साचें नसे ।

माझ्या स्वरूपीं मन तैसें । मिथ्या भासे कल्पनामात्र ॥३७॥

विचारितां शब्दमहिमान । शब्द स्वरूपें ज्ञानघन ।

ज्ञानार्थेंवीण वचन । अल्पही जाण असेना ॥३८॥

वक्ता वाच्य वचन । तीनी मीचि आहें जाण ।

बोलु बोलका मजवीण । दुसरा जगीं कोण असे ॥३९॥

मी वेदू जाण पां वेदांचा । प्रणवरूप मीचि साचा ।

मुख्य वाचेची मीचि वाचा । वेगळा शब्दाचा ठावो नाहीं ॥३४०॥

दृष्टीचें जें देखणेंपण । देखणें तेंचि मुख्य ज्ञान ।

तेंचि जाण ब्रह्म पूर्ण । चैतन्यघन निजदृष्टीं ॥४१॥

मीचि डोळा मीचि देखता । दृश्य द्रष्टा मीचि तत्त्वतां ।

मजवेगळी देखणी अवस्था । नाहीं सर्वथा तिहीं लोकीं ॥४२॥

मीचि डोळियांचा निजडोळा । मी सर्वांगदेखणा सोज्ज्वळा ।

मजवेगळी देखणी कळा । नाहीं जिव्हाळा आणिकांचा ॥४३॥

मीचि शब्दांतें शब्दविता । मीचि श्रवणांमाजीं श्रोता ।

ऐशिया एकात्मता पाहतां । शब्द निःशब्दता परब्रह्म ॥४४॥

कान वचन मीचि श्रोता । मीचि जाणता शब्दार्था ।

ऐकणाही मजपरता । नाहीं तत्त्वतां श्रवणाचा ॥४५॥

मीचि घ्राण मीचि वास । मीचि जाणता सुवास ।

मजवेगळा रहिवास । परिमळास असेना ॥४६॥

रसना रसज्ञत्वें चोखडी । परी ते केवळ चामडी ।

कापूनि सोडिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४७॥

मीचि रसू मीचि रसना । स्वादु सेविता मीचि जाणा ।

मजवेगळा चवीचाखणा । रसज्ञपणा आन नाहीं ॥४८॥

इतर इंद्रियप्रवृत्ती । त्याही मद्‌रूप जाण निश्चितीं ।

मी सर्वात्मा आत्ममूर्ती । क्रियाशक्ती तेही मीचि ॥४९॥

पांचभौतिक देहाचा गोळा । भ्रांत म्हणती मजवेगळा ।

चुकोनि व्यापका सकळा । तो कोठें निराळा राहों लाहे ॥३५०॥

जैसे जळींचे जळतरंग । जळरूपें जळीं क्रीडती चांग ।

तैसे माझ्या स्वरूपीं साङ्ग । देह अनेग मद्‌रूपे ॥५१॥

हो कां घृताची पुतळी । थिजोनि जाली एके काळीं ।

परी ते नव्हे घृतपणावेगळी । तेवीं भूतें झालीं मजमाजीं ॥५२॥

जळीं जळाची जळसागर । जळामाजीं भासली साकार ।

तैसें मजमाजीं चराचर । अभिन्न साचार मद्‌रूपीं ॥५३॥

जैसा एकला एक तंतू । सुतेंचि विणिला सुताआंतू ।

त्यां वेगळाले म्हणती तांतू । तैसें मजआंतू जग भासे ॥५४॥

तंतू पाहतां वस्त्र न दिसे । आत्मा लक्षितां जगचि नसे ।

येणें अद्वैततत्त्वसौरसें । आहे अनायासें परब्रह्म ॥५५॥

ऐसा अद्वैतबोधें मी एकू । सर्वात्मा सर्वात्मकू ।

हा निश्चयेंसीं विवेकू । बुद्धिबोधें निष्टंकू जाणावा ॥५६॥

मीचि एक सर्वां ठायीं । हेंचि दृढ धरिल्या पाहीं ।

मग साधनाचें कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्यमुक्त ॥५७॥

सर्वात्मा चैतन्यघन । अतिसुलभ हें निजज्ञान ।

उद्धवा म्यां हें सांगोन जाण । भेदखंडण केलें त्यांचें ॥५८॥

सनकादिकांचा पूर्वील प्रश्न । जो ब्रह्मादिकां अटक जाण ।

त्याचेंही म्यां प्रतिवचन । विवंचूनि ज्ञान सांगितलें ॥५९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel