मद्विभूतीरभिध्यायन् श्रीवत्सास्त्रविभूषिताः ।
ध्वजातपत्रव्यजनैः स भवेदपराजितः ॥३०॥
अपराजयसिद्धी प्राप्ती । ध्याना आणावी माझी मूर्ती ।
जिचेनि नांवे जयो पावती । जाण निश्चितीं सुरवर ॥ ७२॥
चतुर्भुज घनश्याम । शंखचक्रगदापद्म ।
छत्रातपत्र चामरयुग्म । ध्वजीं उत्तम गरुडलांछन ॥७३॥
रत्नदंडें झणत्कार । व्यजन वीजिती सनागर ।
चरणीं गर्जती तोडर । तोडरीं अपार अरिवर्ग ॥७४॥
ऐशिये माझे मूर्तीचें ध्यान । जो सर्वदा करी सावधान ।
तो सर्वत्र विजयी जाण । अभंगपण माझेनी ॥७५॥
तो माझेनि ध्यानें पाहें । कोणी न मेळवितां साह्ये ।
एकला सर्वत्र विजयी होये । ऐशी सिद्धी लाहे या निष्ठा ॥७६॥
जो मी हृदयीं धरी अजितू । तो सर्वत्र होय अपराजितू ।
ऐसें सांगोनि भगवंतू । उपसंहारितू सिद्धींतें ॥७७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.