यो वै वाङ्मनसी सम्यगसंयच्छन् धिया यतिः ।
तस्य व्रतं तपो दानं स्रवत्यामघटाम्बुवत् ॥४३॥
म्यां सांगितल्या नेमाचे निगुतीं । मनबुद्धि इंद्रियपंक्ती ।
जो नेमीना साक्षेपस्थितीं । त्याचीं साधनें होती नश्वर ॥२॥
त्याचें व्रत तप दान । योग याग शब्दज्ञान ।
काचे भांड्यांतील जीवन । तैशीं जाण नासती ॥३॥
जेवीं राखेमाजीं केला होम । कां अशौचें आचरला कर्म ।
कुपात्रीं दानधर्म । तैसा संभ्रम साधनां ॥४॥
उखरीं पेरिलें बीज । कां गोळक आवंतिला द्विज ।
डोहळ्यांचे सोहळे भोगी वांझ । तैशी वोज साधनां ॥५॥
यापरी गा निश्चितीं । विध्युक्त नेम नाहीं चित्ती ।
त्याचीं साधनें वृथा जाती । हातोहातीं उद्धवा ॥६॥
यालागीं मनादि इंद्रियवृत्ती । नेमाव्या गा यथानिगुतीं ।
हेंचि उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.