समुद्धरन्ति ये विप्रं सीदन्तं मत्परायणम् ।

तानुद्धरिष्ये नचिरादापद्‍भयो नौरिवार्णवात् ॥४४॥

आधींच पूज्य ब्राह्मण । त्याहीवरी माझा भक्त जाण ।

माझे निजभजनें अतिसंपन्न । मद्‍भावें पूर्ण परिपक्व ॥३४॥

मागणें नाहीं सर्वथां । हा नेम माझिया निजभक्ता ।

त्यासी पीडिजे क्षुधादि व्याथा । ते निवारिता जो होय ॥३५॥

देऊनि अन्न जीवन । वस्त्र आदिकरूनि लवण ।

ऐसें वेंचूनियां निजधन । भक्तसंरक्षण जो करी ॥३६॥

नाहीं देणें निर्भर्त्सितां । देऊनि आभार न ठेवी माथां ।

सन्मानें अतिनम्रता । जो मद्‍भक्तां संरक्षी ॥३७॥

जेवीं पोटांतले कळवळेंसी । माता गोड तें दे बाळकासी ।

तेवीं सांडोनि निजस्वार्थासी । माझ्या भक्तांसी जो रक्षी ॥३८॥

तैं मागें सांडूनि निजभक्ता । त्यासी मी वाहीं आपुले माथां ।

मग वैकुंठाही वरुता । त्याहीपरता पाववीं ॥३९॥

ज्यासी म्यां वाहिलें निजमाथां । त्यासी कोण्या अर्थाची दुर्लभता ।

जो संरक्षी माझ्या निजभक्तां । त्यासी उद्धरिता मी उद्धवा ॥४४०॥

माझे भक्तांचीं सांकडीं । जो कोणी निजांगें दवडी ।

त्यासी भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ॥४१॥

जेवीं कां जळसागरीं । नाव धनवंतातें तारी ।

तेवीं भक्तरक्षका संसारीं । मी उद्धरीं उद्धवा ॥४२॥

यापरी धनवंत जन । जो करी भक्तसंरक्षण ।

देवकीवसुदेवांची आण । त्याचें उद्धरण मी करीं ॥४३॥

सर्वांचे आपत्तीचें निवारण । राजेनि करावें आपण ।

त्या राजधर्माचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel