मदर्थेऽर्थपरित्यागो भोगस्य च सुखस्य च ।

इष्टं दत्तं हुतं जप्तं मदर्थं यद्व्रतं तपः ॥२३॥

मी परमात्मा परम स्वार्थ । ऐसा करूनि निश्चितार्थ ।

वेंचिती धन धान्य सर्वार्थ । निजपरमार्थ साधावया ॥५१॥

परमार्थ साधावया अव्यंग । साचार पोटींचा विराग ।

मी भेटावया श्रीरंग । सकळ भोग सांडिती ॥५२॥

छत्र चामर हस्ती घोडे । त्यागून होती गा उघडे ।

ऐसें वैराग्य धडपुडें । मज रोकडें पावायया ॥५३॥

माझें पावावया निजसुख । द्रव्यदारापुत्रादिक ।

त्यागूनि सांडिती निःशेख । यापरी देख अनुतापी ॥५४॥

आवडीं करितां माझें भजन । विसरे भोगाची आठवण ।

माझे प्राप्तीलागीं जाण । रिता क्षण जावों नेदी ॥५५॥

माझोनि उद्देशें परम । करी श्रौतस्मार्त स्वकर्म ।

अग्निहोत्रादि याग परम । व्रत नेम भजलागीं ॥५६॥

माझें ठाकावया चिद्‌रूप । गायत्रादि मंत्रजप ।

माझें पावावया निजस्वरूप । दुष्कर तप आचरती ॥५७॥

मी विश्वात्मा विश्वतोमुखी । विश्वंभर होतसें सुखी ।

यालागीं तो दीनमुखीं । करी आवश्यकीं अन्नदान ॥५८॥

हृदयीं मी स्वतःसिद्ध जाण । त्या माझें करूनि आवाहन ।

आपण करी जें भोजन । तेंही मदर्पण तो करी ॥५९॥

कवळकवळीं हरिस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण ।

यापरी माझे भक्त जाण । कर्म मदर्पण स्वयें करिती ॥२६०॥

ऐशीं सर्व कर्में कृष्णार्पण । सर्वदा जो करी जाण ।

त्यांचे मन होय मदर्पण । तेंचि निरूपण देवो सांगे ॥६१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel