कर्मण्यो गुणवान्कालो द्रव्यतः स्वत एव वा ।

यतो निवर्तते कर्म स दोषोऽकर्मकः स्मृतः ॥९॥

देश काळ द्रव्य पात्र । हे सामग्री होय स्वतंत्र ।

तोचि काळ अतिपवित्र । वेदशास्त्रसंमत ॥९१॥

ग्रहणकपिलाषष्ठ्यादिद्वारा । तो काळ परम पवित्र खरा ।

कां संतसज्जन आलिया घरा । काळाचा उभारा अतिपवित्र ॥९२॥

हो कां संपत्ति आलिया हाता । कां धर्मी उल्हास जेव्हां चित्ता ।

तो `पुण्यकाळ' तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां अनुकूल ॥९३॥

पुरुषासी पर्वकाळ । जन्मात जोडे एकवेळ ।

मातापित्यांचा अंतकाळ । ते धर्माची वेळ अपवित्र ॥९४॥

हा पर्वकाळ मागुता । पुरुषासी नातुडे सर्वथा ।

तेथ श्रद्धेनें धर्म करितां । पवित्रता अक्षय ॥९५॥

स्वभावें काळाची पवित्रता । तुज मी सांगेन आतां ।

जो उपकारी सर्वथा । निजस्वार्था साधक ॥९६॥

ब्राह्म मुहूर्त तत्त्वतां । पवित्र जाण स्वभावतां ।

जो साधकांच्या निजस्वार्था । होय वाढवितां अनुदिनीं ॥९७॥

काळाची अकर्मकता । ऐक सांगेन मी आतां ।

कर्म करूं नये स्वभावतां । निषिद्धता महादोषु ॥९८॥

जेथ जळस्थळादि सर्वथा । विहित द्रव्य न ये हाता ।

तो काळ अकर्मकता । जाण तत्त्वतां निश्चित ॥९९॥

जो काळ सूतकें व्यापिला । कां राष्ट्र-उपप्लवें जो आला ।

जे काळीं देह परतंत्र झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥१००॥

जो काळ दुर्भिक्षासी आला । जो कां ज्वरादिदोषीं दूषिला ।

जो काळ चोराकुलित झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥१॥

जे काळीं क्रोध संचरला । जेथ तमोगुण क्षोभला ।

निद्राआलस्यें व्यापिला । तो काळ बोलिला अकर्मक ॥२॥

अकस्मात सुखसंपदा । कां अभिनव वार्ता एकदा ।

कां लंघिजे भल्याची मर्यादा । तो काळ सर्वदा अकर्मक ॥३॥

कां मार्गीं विषमता । पंथ क्रमिजे चालतां ।

तेथ पडे दुर्धर्षता । तो काळ तत्त्वतां अकर्मक ॥४॥

जे काळीं द्रव्यलोभ दारुण । जे काळीं चिंता गहन ।

केव्हां विकल्पें भरे मन । तो काळ जाण अकर्मक ॥५॥

ऐशी काळाची अकर्मकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां ।

आतां द्रव्याची शुद्धाशुद्धता । ऐक सर्वथा सांगेन ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel