शब्दब्रह्म सुदुर्बोधं प्राणेन्द्रियमनोमयम् ।
अनन्तपारं गम्भीरं दुर्विगाह्यं समुद्रवत् ॥३६॥
माझी वेदरूप जे बोली । शब्दतः अर्थतः अगाध खोली ।
ब्रह्मादिकां भुली पडली । मर्यादा केली न वचेनि ॥६८॥
बाहीं न तरवे समुद्र । तेवीं स्वमतीं न कळे वेदपार ।
येचि अर्थीं नाना ऋषीश्वर । युक्तीचे संभार वेंचिले ॥६९॥
परी एवंविध तत्त्वतां । हे वेदवादाची कथा ।
न येचि कोणाचेही हाता । अर्थतः शब्दतः दुर्ज्ञेय ॥३७०॥
ज्याची शब्दवाचकता । स्वरवर्णें शुद्ध न ये हाता ।
त्याची अर्थावबोधकता । अगम्य सर्वथा सुरनरां ॥७१॥
पूर्वीं हाचि वेद अनुच्छिष्ट । म्यां ब्रह्मयाहातें करविला पाठ ।
तेणेंही नेणोनियां स्पष्ट । कर्मीं कर्मठ होऊनि ठेला ॥७२॥
ते कर्मक्रिया अतिगोमटी । शंखें ह्रिली उठाउठी ।
ब्रह्मा विसरला वेदगोठी । पडलें सृष्टीं कर्मांध्य ॥७३॥
तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर ।
सकळ श्रुतींचा संभार । ब्रह्मयासी साचार दीधला ॥७४॥
म्यां वेद ठेविले ब्रह्ययापुढें । तो पूर्व स्मरेना धडफुडें ।
तेव्हा चाकाटलें बापुडें । केवळ वेडें होऊनि ठेलें ॥७५॥
त्या वेदभागालागीं जाण । ऋषीं वेंचिलें निजज्ञान ।
शाखोपशाखीं रावण । वेदविभागन करूं आला ॥७६॥
परी इत्थंभूत तत्त्वतां । माझ्या वेदविभागाची वार्ता ।
न येचि कोणाचिया हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥७७॥
तो मी वेदस्थापक श्रीहरी । लोक राखावया मर्यादेवरी ।
स्वयें सत्यवतीच्या उदरीं । झालों अवतारधारी श्रीव्यास ॥७८॥
वेदविभागीं राजहंसु । यालागीं नामें `वेदव्यासु' ।
तेणें म्यां केला श्रुतिविलासु । वेदविशेषु चतुर्धा ॥७९॥
वेद अर्थत्वें अतिदुर्घट । परी वाचकत्वें झाला प्रगट ।
त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ । ऐक स्पष्ट सांगेन ॥३८०॥
नादाचें प्रथम स्फुरण । घोषमात्र सूक्षम प्राण ।
ती नांव `परा' वाचा जाण । प्रथम लक्षण ॐकारीं ॥८१॥
तोचि नादयुक्त प्राण । अंतःकरणीं होय स्फुरण ।
ते `पश्यंती' वाचा जाण । विवेकलक्षण तीमाजीं ॥८२॥
नाभीपासोनी नाभिस्वरीं । जे घुमघुमी कंठवरी ।
ते `मध्यमा' वाचा खरी । स्वयें श्रीहरी सांगत ॥८३॥
अकार-उकार-मकार । स्वरवर्णयुक्त उच्चार ।
जेथ प्रगट होय ओंकार । ते वाचा साचार `वैखरी' ॥८४॥
ते वैखरीच्या ठायीं । शाखोपशाखीं जो कांहीं ।
वेद अनंतरूप पाहीं । त्यासही नाहीं मर्यादा ॥८५॥
यापरी वेद अमर्याद । जरी चतुर्धा केला विशद ।
तरी जनासी अतिदुर्बोध । यालागीं उपवेद विभागिले ॥८६॥
ऐसेनिही जनासी न कळे वेद । यालागीं वेदावरी पद ।
श्रीव्यासें केले विशद । तरी वेदार्थ शुद्ध कळेना ॥८७॥
येचि अर्थीं ऋषीश्वर बहुत । सुमंतु जैमिनी भाष्य भारत ।
पैल सूत्रादि जे समस्त । शिणतां वेदार्थ न कळेचि ॥८८॥
एवं वाच्यता आणि लक्ष्यता । स्थूलसूक्ष्मत्वें वेदार्थज्ञाता ।
मजवांचूनि तत्त्वतां । आणिक सर्वथा असेना ॥८९॥