सत्त्वं ज्ञानं रजः कर्म, तमोऽज्ञानमिहोच्यते ।
गुणव्यतिकरः कालः, स्वभावः सूत्रमेव च ॥१३॥
सत्त्वगुणास्तव ’ज्ञान’ । रजोगुणें ’कर्म’ जाण ।
मोह आलस्ययुक्त गहन । तमीं ’अज्ञान’ नांदत ॥४१॥
सत्त्वादि जे तिन्ही गुण । केवळ प्रकृतीचे हे जाण ।
यांसी स्वतंत्रपण । नव्हेचि जाण या हेतू ॥४२॥
गुणक्षोभक ’काळ’ देख । तो पुरुषाचा अवलोक ।
पुरुष काळ हा नामविशेख । स्वरुपें एक हे दोन्ही ॥४३॥
स्वाभाविक मायेचें स्फुरण । प्रथम कार्य जें निर्माण ।
त्या नांव ’महत्तत्त्व’ जाण । ’सूत्र’ ’प्रधान’ ज्यासी म्हणती ॥४४॥
यालागीं प्रकृतीहूनि भिन्न । यासी न ये वेगळेंपण ।
हे प्रकृति कार्यकारणीं अभिन्न । तत्त्वविचक्षण मानिती ॥४५॥
अठ्ठावीस तत्त्वें पूर्वोक्त । हें भगवंताचें निज मत ।
तेंचि अडीचा श्लोकीं सांगत । संख्यातत्त्वार्थ निजबोधें ॥४६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.