त्वत्तो ज्ञानं हि जीवानां प्रमोषस्तेऽत्र शक्तितः ।

त्वमेव ह्यात्ममायाया गतिं वेत्थ न चापरः ॥२८॥

अतर्क्य तुझी मायाशक्ती । त्या आवरुनि आनंदस्फूर्ती ।

दृढ लावूनि विषयासक्ती । तेणें जीव होती अज्ञान ॥६९॥

करितां विषयांचें ध्यान । जीव होय मनाअधीन ।

त्यास मन करी हीनदीन । अतिकृपण जड मूढ ॥२७०॥

ऐसे केवळ जीव जे अज्ञान । ते तुझ्या कृपाकटाक्षें जाण ।

झाले गा ज्ञानसंपन्न । हे कृपा पूर्ण पैं तुझी ॥७१॥

तुझी कृपा झालिया परिपूर्ण । करुनि मायेचें निर्दळण ।

जीव होती ब्रह्म पूर्ण । तुझेनि जाण श्रीकृष्णा ॥७२॥

म्हणशी माझे गांठीं जाण । नाहीं ज्ञान ना अज्ञान ।

तरी तूं ज्ञानदाता आपण । झालासी पूर्ण तें ऐक ॥७३॥

धातासवितासनत्कुमारांसी । नारदप्रर्‍हादअंबरीषांसी ।

कालीं उपदेशिलें अर्जुनासी । ऐसा तूं होसी ज्ञानदाता ॥७४॥

म्हणसी बहुत असती सज्ञान । त्यांसी पुसोनि साधावें ज्ञान ।

तुजवेगळें मायेचें नियमन । त्यांचेनि जाण कदा नोहे ॥७५॥

मायेची उत्पत्तिस्थिती । मायानिर्दळणी गती ।

तूं एक जाणता त्रिजगतीं । यालागीं श्रीपती कृपा करीं ॥७६॥

यापरी उद्धवें विनंती । करुनि प्रार्थिला श्रीपती ।

तो प्रकृतिपुरुषविभाग युक्तीं । उद्धवाप्रती सांगेल ॥७७॥

जेवीं सूर्यापाशीं मृगजळ । कां गगनीं उपजे आभाळ ।

काचभूमिके दिसे जळ । तैशी प्रकृति सबळ पुरुषापाशीं ॥७८॥

यापरी स्वयें श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषनिरुपण ।

समूळ सांगताहे आपण । तो म्हणे सावधान उद्धवा ॥७९॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel