स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान् ।

द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनथस्य धामनि ॥२३॥

ब्राह्मणें करितां स्वधर्म । वासना झळंबे स्वर्गकाम ।

तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥६६॥

ज्याचिया याजनस्थिती । इतरांसी होय स्वर्गप्राप्ती ।

एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥६७॥

सांडूनि ईषणात्रयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी ।

मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥६८॥

तो अनुग्रही जयांसी । ते पावती निजमोक्षासी ।

एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥६९॥

स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञाधारी ।

एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥३७०॥

ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।

तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥७१॥

दुर्लभ येथें माणुसपण । त्यामाजीं अतिदुर्लभ ब्राह्मण्य ।

तेंही पावोनि मी आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥७२॥

पावोनि ब्राह्मणशरीर । धनें नाडले थोरथोर ।

अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥७३॥;

अर्थ अनर्थाचें भाजन । तें निःशेष त्यागावें धन ।

वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥७४॥

॥आशंका ॥ दैवें जोडिलें संपत्तीसी । नेऊनि सांडावें बिदीसी ।

कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥७५॥

तें अर्थत्यागनिरुपण । स्वयें सांगताहे ब्राह्मण ।

जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥७६॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel