सोऽसृजत्तपसा युक्तो रजसा मदनुग्रहात् ।

लोकान् सपालान् विश्वात्मा भूर्भुवःस्वरिति त्रिधा ॥११॥

ब्रह्मा रजोगुणप्रधान । नाभिकमळीं बैसोनि जाण ।

मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥४८॥

स्वयें बैसल्या कमळासी । कमळमूळ न कळे त्यासी ।

देखे एकार्णव जळासी । रजोगुणेंसीं मोहित ॥४९॥

तें कमळमूळ पहावया बुडीं । एकार्णवीं घालोनि उडी ।

बुडतां दिवसांचिया कोदी । त्या मूळाचि जोडी न लभेचि ब्रह्मा ॥१५०॥

तेथ निर्बुजला जळभयें । बाहेरी उसासे लवलाहें ।

कमळावरी बैसोनि पाहें । करावें काये स्मरेना ॥५१॥

धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता ।

तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥५२॥

ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । रजें रजांध झालें केवळ ।

धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥५३॥

मज विश्वात्म्याचें अपत्य । जडत्वें राहिला तटस्थ ।

म्यां उपदेशिला तेथ । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥५४॥

महाकल्पादींचे मांडणी । माझिया अशरीरी वाणी ।

तप तप या दों वचनीं । उपदेशिला अग्रगणी चतुरानन ॥५५॥

यथोक्त तप करितां जाण । वृद्धि पावला सत्त्वगुण ।

त्याचिया सात्त्विकता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥५६॥

काळत्रयीं अबाधित । तूंचि विश्वात्मा निश्चित ।

हें चतुःश्लोकी भागवत । म्यां त्यासी तेथ उपदेशिलें ॥५७॥

माझिया उपदेशविधीं । होऊनियां समबुद्धी ।

कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥५८॥

यापरी ब्रह्मा कल्पादी । पावला परम समाधी ।

प्रकटोनि निजात्मबुद्धी । सर्जनसिद्धी तेणें केली ॥५९॥

सुरासुर मानव पन्नगादिक । यांचे वसते तिन्ही लोक ।

सप्तपाताळ घरें देख । गोपुरें अलोलिक सप्तसंख्या ॥१६०॥

भूशब्दें पाताळलोक । भुवःशब्दें मृत्युलोक ।

स्वःशब्दें स्वर्गलोक । त्रिलोक देख या नांव ॥६१॥

चतुर्दश भुवनें सकळ । तेथ वसते लोक लोकपाळ ।

तेंचि करोनियां विवळ । सांगे प्रांजळ श्रीकृष्ण ॥६२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel