कैवल्यं सात्त्विकं ज्ञानं रजो वैकल्पिकं च यत् ।
प्राकृतं तामसं ज्ञानं मन्निष्ठं निर्गुण स्मृतम् ॥२४॥
देहीं असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत।
भूतां सबाह्य सभराभरित । हें ज्ञान निश्चित सात्विक ॥१५॥
भिन्न खाणी भिन्नाकार । भिन्न नांवें भिन्न व्यापार ।
तेथ वस्तु देखे अभिन्नाकार । हें ज्ञान साचार सात्विक ॥१६॥
करुनि वेदशास्त्रपठन । निर्धारितां निजज्ञान ।
सवेंचि विकल्पी आपण । विकल्प पूर्ण रजाचे ॥१७॥
करुन वार्तिकान्त व्युत्पत्ती । अद्वैतनिश्चयो नाहीं चित्तीं ।
आपण विकल्पी आपुल्या युक्ती । तें ज्ञान निश्चितीं राजस ॥१८॥
करुनि वेदशास्त्रश्रवण । होय शिश्नोदरपरायण ।
इंद्रियार्थी श्रद्धा पूर्ण । तो केवळ जाण राजस ॥१९॥
एक निश्चयो नाहीं चित्तीं । विकल्प उपजती नेणो किती।
हे रजोगुणाची ज्ञानवृत्ती । ऐक निश्चितीं तमोगुण ॥३२०॥
महामोहो गिळी ज्ञानस्फूर्ती । मी जड अंध मानी निश्चितीं ।
नश्वर पदार्थी आसक्ती । तें ज्ञान निश्चितीं तामस ॥२१॥
आहार निद्रा भय मैथुन । केवळ पशुप्राय जें ज्ञान ।
तें निश्चयें तामस जाण । ऐक निर्गुणविभाग ॥२२॥
कार्य कर्ता आणि कारण । त्रिपुटी त्रिगुणेंसी करुनि शून्य ।
केवळ जैं चैतन्यघन । तें निर्गुण ज्ञान उद्धवा ॥२३॥
सत्वाचेनि निजउल्हासें । सर्वेंद्रियीं ज्ञान प्रकाशे ।
तें ज्ञानचि मानी वायवसें । मी ज्ञानरुपें असें अनादि ॥२४॥
सिंधुजळें सरिता वाहती । त्या आलिया सिंधूप्रती ।
तेणें उल्हासेना अपांपती । तेवीं ज्ञानस्फूर्ती श्लाघेना ॥२५॥
रजोगुणें आलिया सकाम । त्यासी क्षोभूं न शके काम ।
म्हणे माझेनि चाले काम्य कर्म । शेखीं मी निष्काम निजांगें ॥२६॥
होतां काम्य कर्माचा सोहळा । जेवीं सूर्या न बाधी उन्हाळा ।
तेवीं काम्य कर्मी मी जिव्हाळा । माझेनि सोज्ज्वळा काम सवेग ॥२७॥
तमोगुणाच्या झडाडा । पडिला महामोहाचा वेढा ।
न करितां मोहाचा निझाडा । मोहनिर्णय गाढा आपण पैं जाणे ॥२८॥
सूर्यो न दिसे जिकडे । अंधारु व्यापी तिकडे ।
तेवीं स्वरुपनिष्ठेपुढें । न बाधी सांकडें मोहाचें ॥२९॥
अंगीं आदळतां तिन्ही गुण । जो गजबजीना आपण ।
ते निजनिष्ठा निजनिर्गुण । उद्धवा जाण निश्चित ॥३३०॥
अज्ञानाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी ।
प्रवर्ततां कामाचारीं । निष्कामाचा न करी पांगडा ॥३१॥
आदळतां मोहाचीं झटें । ज्याचा बोध कदा न पालटे ।
त्रिगुणीं निर्गुणत्वें राहाटे । माझिया निष्ठें मद्भक्त ॥३२॥
त्रिगुणांचा त्रिविध वास । निर्गुण निजरहिवास ।
येचि अर्थी हृषीकेश । विशद विलास सांगत ॥३३॥;