यथा नभो वाय्वनलाम्बुभूगुणैर्गतागतैर्वर्तुगुणैर्न सज्जते ॥

तथाऽक्षरं सत्त्वरजस्तमोमलैरहंमतेः संसृतिहेतुभिः परम् ॥२६॥

पृथ्वी जळ अनळ अनिळ । त्यांसी नभ व्यापक सकळ ।

परी पृथ्व्यादिकांचा मळ । नभासी अळुमाळ लागेना ॥४१॥

नभ पृथ्वीरजें कदा न मैळे । धुरकटेना धूमकल्लोळें ।

अग्नीचेनि महाज्वाळें । कदाकाळें जळेना ॥४२॥

वायूचेनि अतिझडाडें । आकाश कदाकाळें न उडे ।

उदकाचेनि अतिचढें । आकाश न बुडे सर्वथा ॥४३॥

कां सूर्याचे निदाघकिरणीं । नभ घामेजेना उन्हाळेनी।

अथवा हिमाचिया हिमकणीं । नभ कांकडोनी हिंवेना ॥४४॥

पर्जन्य वर्षतां प्रबळ । नभ वोलें नव्हे अळुमाळ ।

यापरी नभ निर्मळ । लावितांही मळ लागेना ॥४५॥

त्या आकाशासी अलिप्त । जें क्षराक्षराही अतीत ।

तें अक्षर परब्रह्म सदोदित । त्रिगुणातीत चिन्मात्र ॥४६॥

जें अजरामर अविनाशी । जें प्रकाशमान स्वप्रकाशीं ।

ऐसिये वस्तूची प्राप्ती ज्यासी । अद्वयत्वेंसीं फावली ॥४७॥

जेवीं न मोडितां लागवेगें । सोनटका सोनें झाला सर्वांगें ।

तेवीं करणीवीण येणें योगें । जे झाले निजांगें परब्रह्म ॥४८॥

त्यांसी गुणांची त्रिगुण मागी । लावितांही न लगे अंगीं ।

विषयी करितां विषयभोगीं । ते विषयसंगीं निःसंग ॥४९॥

घटीं चंद्रबिंब दिसे । तें घटासी स्पर्शेलें नसे ।

ओलें नव्हे जळरसें । देहीं जीव असे अलिप्त तैसा ॥३५०॥

ते घटीं कालविल्या शेण । बिंबप्रतिबिंबां नातळे जाण ।

तेवीं देहींचें पापाचरण । जीवशिवस्थान ठाकीना ॥५१॥

घटीं कालविल्या कस्तूरी । बिंबप्रतिबिंब सुवास न धरी ।

तेवीं देहींच्या पापपुण्याची थोरी । जीवशिवावरी पावेना ॥५२॥

आकाश जळावयालागीं । घृतें पेटविली महाआगी ।

आकाश असतां अग्निसंगीं । दाहो अंगीं लागेना ॥५३॥

आकाश असोनि अग्निमेळें । अग्निज्वाळे कदा न जळे ।

तेवीं ज्ञाता विषयकल्लोळें । कदा काळें विषयी नव्हे ॥५४॥

गुणांचेनि देहसंगें । योगी वर्ततां येणें योगें ।

ते भोगितांही विषयभोगें । अलिप्त सर्वागें सर्वदा ॥५५॥

हें कळलें ज्यां भोगवर्म । ते देहीं असोन परब्रह्म ।

त्यांसी बाधीना भोगभ्रम । अक्षर परम स्वयें झाले ॥५६॥

ते अक्षर झाले आतां । याही बोलासी ये लघुता ।

जन ज्ञानीं अज्ञानीं वर्ततां । अक्षरता अभंग ॥५७॥

ते विसरोनि ब्रह्मरुपता । मी देही म्हणवी देहअहंता ।

तेथें वाढली विषयावस्था । दृढ बद्धता तेणें झाली ॥५८॥

ते निवारावया बद्धता । त्यजावी विषयलोलुपता ।

विष्यत्यागेंवीण सर्वथा । नित्यमुक्तता घडेना ॥५९॥

न जोडतां नित्यमुक्तता । साधक जरी झाला ज्ञाता ।

तरी तेणें ज्ञातेपणें सर्वथा । विषयासक्तता न करावी ॥३६०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel