यावत्सर्वेषु भूतेषु, मद्भावो नोपजायते ।

तावदेवमुपासीत, वाङवनः कायवृत्तिभिः ॥१७॥

आपुला देह घालोनि पुढें । जें जें भूत दृष्टीं आतुडे ।

तेथ भगवद्भावें ठसा पडे । वाडेंकोडें निश्चित ॥४४॥

दृष्टीं पाहतां जें जें भासे । दृष्टीं नातुडतां जें जें दिसे ।

तें तें ज्यासी अनायासें । भासे आपैसें चिद्रूप ॥४५॥

मनाचे कल्पने जें जें आलें । कां कल्पनातीत जें जें ठेलें ।

तें तें ज्यासी अनुभवा आलें । स्वरुप आपुलें मद्रूपत्वें ॥४६॥

कायिक कर्माचार । वैदिक लौकिक व्यापार ।

ते ज्यासी दिसती मदाकार । चराचर मद्रूपें ॥४७॥

जागृतिस्वप्नसुषुप्तीसीं । देखिजे भोगिजे ज्या सुखासी।

तें तें मद्रूप ज्यासी । निश्चयेंसीं ठसावे ॥४८॥

स्वाभाविक जे व्यापार । देहीं निफजती अपार ।

ज्यासी मद्रूपें साचार । निश्चयें निर्धार ढळेना ॥४९॥

ऐशी न जोडतां अवस्था । सर्व भूतीं भगवद्भावता ।

भजावें गा तत्त्वतां । निजस्वार्था लागूनी ॥३५०॥

हे सांडूनि भजनावस्था । नाना साधनीं प्रयास करितां ।

माझ्या अनुभवाची वार्ता । न चढे हाता कल्पांतीं ॥५१॥

ऐसें जाणूनियां आपण । सर्व भूतीं भगवद्भजन ।

करावें निश्चयेंसीं जाण । हे आज्ञा संपूर्ण पैं माझी ॥५२॥

सांडोनि युक्तीची व्युत्पत्ती । धरितां भगवद्भाव सर्वभूतीं ।

येणेंचि माझी सुगम प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥५३॥

माझिये प्राप्तीचें सुगम साधन । उद्धवा तुवां पुशिलें जाण ।

तरी सर्व भूतीं भगवद्भजन । तदर्थ जाण सांगितलें ॥५४॥

हा ब्रह्मप्राप्तीचा उपाव पूर्ण । माझे जिव्हारींची निजखूण ।

सुगमप्राप्तीलागीं जाण । उत्तम साधन सांगितलें ॥५५॥

येणें सुगम ज्ञानस्थिती । येणें सुगम माझी भक्ती ।

येणें सुगम माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥५६॥;

सर्व भूतीं ब्रह्मस्थिती । ज्यासी निश्चयें जाहली प्राप्ती ।

त्याची उपरमे भजनवृत्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥५७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel