"वलय" ही कादंबरी मी "1 मे 2016 ते 21 डिसेंबर 2017" या दरम्यान लिहिली आहे. कामाचा व्याप सांभाळून लिहिणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, पण लिहिण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या याआधीच्या "जलजीवा" या सायन्स फिक्शन कादंबरीच्या यशामुळे आणि वाचकांनी त्यावर केलेल्या भरभरून प्रेमामुळे पुन्हा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. जलजीवा लिहिण्याची प्रेरणा देणारे घटक होते- बर्मुडा ट्रँगल, अथांग समुद्र, पाणी आणि जहाजे यांचे लहानपणापासून असणारे कुतूहल आणि आकर्षण! 2011 साली सहज म्हणून मिसळपाव, मायबोली आणि मनोगत या संकेतस्थळांवर क्रमश: लिहिलेली "जलजीवा" खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली ती bookstruck आणि esahitya.com मुळे! त्यानंतर ही google play store वर आणि "प्रतिलिपी" आणि "ऐसी अक्षरे" या संकेतस्थळांवर सुद्धा मोफत उपलब्ध आहे. आजही ही कादंबरी नवनवीन वाचकसंख्या जोडते आहे आणि मला हजारो वाचकांचे फोन किंवा मेसेज येत आहेत. bookstruck तर्फे 2016 साली जलजीवाला "सर्वोत्कृष्ट फँटसी" पुरस्कार मिळाला. जलजीवा व्यतिरिक्त "विश्वरचनेचे अज्ञात भविष्य" ही लघु कादंबरी मी लिहिली आहे आणि मोफत वाचनासाठी उपलब्ध आहे तसेच माझ्या इतर अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
"वलय" लिहिण्यामागची प्रेरणा म्हणजे - टीव्ही आणि चित्रपट क्षेत्राबद्दल लहानपणापासून असणारी आवड आणि आकर्षण! ही कादंबरी लिहितांना मला मोलाची साथ दिली ती माझ्या पत्नीने, कारण ऑफिसमधल्या कामाचा व्याप सांभाळून आणखी मी उरलेला वेळ लेखनात घालवणार म्हणजे कुटुंबाला कमी वेळ! पण तरीही तिने ते सहन केले, तसेच माझ्या कादंबरीची पहिली वाचक तीच! तिने यातील अनेक लॉजिकल चुका माझ्या लक्षात आणून दिल्या. त्याबद्दल तिचे मनापासून आभार!
आणखी मला "गुगल कीप" या अॅप्लिकेशनचे आणि "गुगल मराठी कीबोर्ड" चे मनापासून आभार मानावेसे वाटतात कारण अर्ध्यापेक्षा जास्त कादंबरी ही मी मोबाईलवरच लिहिली आहे, गुगल कीप मध्ये!
कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –
जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या वलयांकित अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी असून ही एक पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे.
काही अपरिहार्य अपवाद वगळता यात उल्लेख असलेली सिनेमांची नावे, सिनेमाशी संबंधित विविध ठिकाणे, कलाकार, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, नाटके, थिएटर्स, पुस्तके, लेखक वगैरे यांची नावे काल्पनिक आहेत!
तसेच गरजेनुसार योग्य तो परिणाम साधण्यासाठी मी काही ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी शब्द आणि वाक्ये मुद्दाम वापरली आहेत.
काही ठिकाणी सेक्सशी संबंधीत बोल्ड प्रसंग, माफक प्रमाणात शिव्या किंवा हिंसेचे वर्णन असल्याने एक सावधगिरीचा उपाय म्हणून पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींनी ही कादंबरी वाचायची किंवा नाही हे पालकांच्या संमतीने ठरवावे किंवा स्वत:च्या जबाबदारीवर कादंबरी वाचावी.
या कादंबरीचा हेतू फक्त वाचकांचे मनोरंजन करणे हा असून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करणे तसेच कुणाचे समर्थन करणे, कुणावर टीका करणे किंवा वाचकांवर विशिष्ट प्रकारची विचारसरणी लादणे हा नाही. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातील वाचक सूज्ञ आहेत त्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नाही!
यातील काल्पनिक व्यक्ती, स्थळे, प्रसंग, संस्था यांचा खऱ्या जगातील गोष्टींशी संबंध किंवा साधर्म्य आढळल्यास तो एक योगायोग मानावा आणि कादंबरी वाचनाचा आनंद घ्यावा! कादंबरी पूर्णपणे वाचून झाल्याशिवाय कादंबरीविषयी जाहीर मतप्रदर्शन करू नये, ही विनंती!
आपल्या प्रतिक्रिया sonar.nimish@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवाव्यात.
-निमिष सोनार (लेखक)