निमिष सोनार यांचे कौतुक करावे तेवढे कमी. IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत, घर सांभाळत, वेळ काढून ते आपली लेखन जिज्ञासा जोपासतात. आणि आपल्या सारख्या वाचकांना तृप्त करतात; हीसुद्धा एक प्रकारची समाज सेवाच आहे. त्याबद्दल त्यांचे आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबियांचे आभार!

मराठी साहित्याच्या दुनियेत अतिशय वेगळया प्रकारचे आणि आधुनिक प्रकारचे साहित्य आणणारे जे काही नवोदित लेखक आहेत त्यांत निमिष सोनार ह्यांचे नाव अग्रेसर आहे ह्यांत शंकाच नाही. त्यांनी यापूर्वी जलजीवा (काल्पनिक कथा), आग्या वेताळ (गूढकथा), शिकारी साखळी (भयकथा), अपूर्ण स्वप्न, शापित श्वास (विज्ञान कथा) अशा अनेक उत्तमोत्तम कादंबऱ्या नि कथा लिहिल्या आहेत. भयकथा, विज्ञान कथा, पल्प फिक्शन, रम्यकथा अश्या अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी विमुक्त संचार केला आहे आणि मराठी साहित्यावर आपली अशी एक विशेष छाप पाडली आहे.


मराठी संकेतस्थळांवर त्यांचे लिखाण उपलब्ध आहे. तसेच त्यांच्या ब्लॉग वर नियमितपणे ते विविध विषयांवर लिहितात.

२०१६ साली आम्ही BookStruck पुरस्कार जाहीर केले. त्यात निमिष सोनार यांच्या "जलजीवा" या कादंबरीला "सर्वोत्कृष्ट fantasy पुरस्कार" मिळाला. तसेच त्यांना "बेस्ट प्रोमिसिंग ऑथर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावरून त्यांच्या लेखनाला खरंच दुजोरा मिळाला. पुरस्काराच्या निमित्ताने मला त्यांचे कार्य जवळून पाहायला मिळाले आणि त्यांना मिळालेले पुरस्कार सार्थ आहेत याची जाणीव झाली

२००९ साली राजकुमार हिरानी यांचा '3 Idiots' खूप गाजला. हा चित्रपट चेतन भगत यांच्या "Five Point Someone" ह्या कादंबरीवर आधारित होता. लेखकाचे नाव चित्रपटाच्या opening credit मध्ये न दाखवता, closing credit मध्ये दाखविल्यामुळे मीडिया मध्ये बराच वाद झाला होता. काही वेळेस मूळ लेखकाला श्रेय दिले जात नाही. अशीच कहाणी आहे 'वलय' मधील मुख्य नायक राजेशची. त्याला लिखाणाची; संवादमय लिखाणाची खूप आवड. शाळेत असताना एक नाटक लिहिले आणि त्याच्या शिक्षकांनी आपाल्या नावाने ते खपविले. एवढेच नाही तर चक्क पारितोषिकही मिळविले. राजेशकडे पुरावा नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव त्याने ही चोरी विसरून जायचे ठरविले. पण नियतीमध्ये काहीतरी वेगळेच होते...

आपण टीव्हीवर चंदेरी दुनियेचा झगमगाट नेहमी विस्मयाने बघतो. ही कादंबरी त्यामागचं "वलय" नि त्यातील भयानक वास्तव डोळ्यासमोर उभं करतं. बाहेरून आपल्याला दिसते ती नट नटींची झगमगीत दुनिया. अशा दुनियेत आपले स्थान, किंबहुना वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी काय काय करावे लागते आणि कशा परिस्थितीतून जावे लागते, याचे तंतोतंत दृश्य लेखकाने ह्या कादंबरीतून उभे केले आहे.

सोनीचा selfie मुळे झालेल नुकसान आणि फायदा; रागिणीच्या जीवनात घडलेल्या घडामोडी; सुप्रियाचा झालेला अपेक्षाभंग... राजेश आणि त्याला जीवनात भेटणाऱ्या विविध पात्रांची शोध आणि प्रतिशोध यांची ही कहाणी तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करून सोडेल.

The Dirty Picture ह्या हिंदी सिनेमात विद्या बालन म्हणते "फ़िल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती हैं Entertainment,Entertainment,Entertainment| और मैं Entertainment हूँ |". तुमच्या हातात असलेली ही कादंबरी तुमचं मनोरंजन करेल, यात काही शंका नाही!

मनोरंजनाच्या झगमगाटात दिपवून टाकणारे हे "वलय" तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही आपल्या आप्तजनांना नक्कीच शेअर कराल अशी आशा बाळगतो!!

सिद्धेश प्रभुगांवकर,
web.bookstruck.com
https://www.facebook.com/bookstruck.in

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel