त्या दिवशी सुप्रिया सोबत "कॅपलर्स कॅफे" मध्ये बोलणे झाल्यावर राजेश रूमवर गेला, त्याने तयारी केली आणि स्टेशन वर आला.
मुंबईहून "स्वागतपुरी" गावाला जायला सात ते आठ तास लागतात. राजेश ट्रेनमधून गावातल्या स्टेशनवर उतरला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. मग रिक्षा करून तो घरी पोहोचला. त्याचे एक छोटेसे वडिलोपार्जीत दुमजली घर होते..
त्याचे वडील लहानपणीच वारले होते. मग त्याने आणि आईने मेहनत करून संसाराचा गाडा इथपर्यंत आणला होता.
दरवाज्यावर टकटक करताच त्याच्या आईने दार उघडले.
"आलास? बराच उशीर झाला. गाडी लेट झाली वाटतं", सुरकुत्यांच्या आडचा तिचा चेहरा आनंदून हसला.
"हो. कंटाळवाणा होता प्रवास!", राजेश म्हणाला
"हो ना. बैस. पाणी देते", आई त्याला म्हणाली.
राजेश पलंगावर बसला. छतावर पंखा वेगात फिरत होता. पाणी पिल्यावर मग तो फ्रेश झाला. जेवतांना इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. मग रात्री झोपण्याच्या वेळेस ट्यूब लाईट बंद करून पिवळा डीम लाईट लावण्यात आला. राजेश आणि त्याची आई झोपायला म्हणून आडवे झाले.
आई झोपेच्या अधीन झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते आणि राजेश मात्र जोरात फिरणाऱ्या छतावरच्या पंख्याकडे बघत होता. पंखा बिचारा अविरत फिरतच होता. डीम लाईट मुळे त्याची सावली बाजूच्या भिंतीवर पडली होती. त्याला फिरत्या पंख्यावर अधून मधून सुप्रिया ची प्रतिमा दिसत होती. त्याने तिला स्पष्ट नाही संगीतल्यावरचा तिचा निराश चेहरा सारखा पंख्याच्या पात्यांवर उमटत होता. त्याच्या मनात अनेक विचारांचे पाते असलेला पंखा फिरत होता.
"सुप्रियाला नाही म्हणून मी चूक केली का?
प्रवासात मला सारखी सुप्रिया का आठवत होती?
का मी इतका कठोर झालो?
होय, झालो!
माझी महत्वाकांक्षा मला प्रिय असल्याने मला सुप्रिया अप्रिय वाटली!
आणि ती पूर्ण होण्यासाठी मी काहीही करेन.....
आणि मी जे करणार आहे त्यात काय चूक आहे? काहीच नाही!
आता बऱ्यापैकी मी या इंडस्ट्रीत लेखक म्हणून स्थिरावलो आहे.
जरा पैसाही जमा झालाय. आता माझ्या मोहिमेस उद्यापासून सुरूवात करायला हरकत नाही!"
अजून झोप येत नव्हती. ती येईल असे त्याला वाटत नव्हते.
"मी कुठे लपलीय शोध?" असे म्हणून झोप लपून बसली होती पण एका क्षणी राजेशने तिच्याशी लपंडाव खेळणे शेवटी सोडून दिले. बेडवर उठून बाजूला ठेवलेल्या तांब्याच्या कळशीतून त्याने पाणी पिले.
मग रात्रीच्या बारा वाजेचा गजर घड्याळाने दिला आणि त्याला तो इयत्ता आठवीत असतानाचा अगदी असाच आवाज असणारा शाळेतल्या घड्याळाचा गजर आठवला….
.... त्या दिवशी दुपारचे बारा वाजले होते. राजेशने लिहिलेले स्वातंत्र्य लढ्यावर आधारित एक छानसे आणि छोटेसे एक नाटक त्याने श्रीयुत खारकातेकर या आर्ट आणि कल्चरच्या शिक्षकांना दिले.
ते शिक्षक आणि राजेश दोघे टीचर्स रुम मध्ये बसले होते. त्याने ते लिखाण त्यांना दिले तेव्हा तिथे इतर कुणी उपस्थित नव्हते.
"राजेश! मला आता लगेच वेळ नाही. पण मी आज रात्री घरी तुझे लिखाण वाचेन!"
राजेश तेथून निघाला आणि वर्गात जाऊन बसला.
त्याला या गोष्टीचे खूप अप्रूप वाटत होते की त्याने लिहिलेले नाटक त्याचे शिक्षक वाचणार!
तसे त्याने आतापर्यंत छोट्या मोठ्या बाल साहसकथा लिहिल्या होत्या. त्या मित्र मैत्रिणींना त्याने वाचूनही दाखवल्या होत्या. सगळ्यांना त्या कथा आवडायच्या. अगदी हौस म्हणून सहजच लिहिलेल्या कथा इतरांना भयंकर आवडून जायच्या. आता आठवड्यानंतर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथमच त्याचे नाटक स्टेजवर साकारणार होते, फक्त खारकाते सरांनी त्याची मान्यता दिली की झाले! या कल्पनेनेच तो एवढा उत्तेजीत झाला की त्याचे समोरच्या गणिताच्या शिक्षकांकडे लक्षच नव्हते. तो त्याच्या नाटकातले संवाद आठवत बसला होता.
"64 चे वर्गमूळ काय? तू सांग राजेश?" राजेश विचारांत गढला आहे बघून शिक्षकांनी विचारले. गणिताच्या त्या शिक्षकांचे नाव होते अंकब्रम्हे सर!!
"चले जाव! चले जाव!" अचानक दचकून त्याच्या तोंडातून अचानक बाहेर पडले आणि सगळा वर्ग हसायला लागला.
"अरे बाळा! काय झालंए तुला? एवढा हुशार मुलगा इतका उदंड कसा काय झाला बरे? तब्येत बरी आहे ना? स्वतः वर्गात लक्ष नाही आणि शिक्षकांना चले जाव म्हणतोस! तूच उठ आणि चले जाव! आणि व्हरांडे में खुद को मुर्गा बनाव!" शिक्षक म्हणाले आणि पूर्ण वर्ग आणखी दुपटीने खळाळून हसला.
"गप्प बसा रे! हसू नका!" शिक्षक गरजले.
भानावर आल्यावर चूक लक्षात आल्याने राजेश ओशाळला आणि म्हणाला, "माफ करा. मला तुम्हाला चले जाव म्हणायचे नव्हते. इंग्रजाना म्हणतो होतो मी: चले जाव.."
सगळा वर्ग आता काहीतरी आणखी गम्मत बघायला मिळेल आणि आणखी मनोरंजन होईल या हेतूने सरसावून बसला.
शिक्षक राजेश जवळ आले, त्याच्या पाठीवर हात ठेवून शांतपणे म्हणाले, "बाळ! दाखव बरे मला, वर्गात कुठे बसले आहेत इंग्रज? माझ्या परवानगी शिवाय ते वर्गात आलेच कसे?"
बाजूची दोन तीन मुले खदखदून हसू लागली. गणिताच्या तासाला अचानक इतिहास सुरु झाल्याने त्याना वेगळीच गम्मत वाटायला लागली.
"गप बसा रे! सोम्या आणि गोम्या! मी बोलतोय ना राजेशसोबत! जरा शांत बसा! हां तर मी काय म्हणत होतो की, इंग्रज कुठे आहेत? मला तर दिसत नाहीएत वर्गात कुठे? की बेंचखाली लपलेत?
"तसं नाही सर! मी लिहिलेल्या नाटकातले संवाद आठवत होतो आणि अचानक त्यातला संवाद माझ्या तोंडून बाहेर पडला. मला माफ करा!", राजेश काकुळतीने म्हणाला.
"बरं बरं ठीक आहे. तू नेहमी असा वागत नाहीस म्हणून तुझी पहिली चूक माफ!. पण लक्षात ठेव! कोणत्याही गोष्टीत एकाग्रता आवश्यक असते. आपण जे करतो ते अगदी मन लावून करावे. वर्गात असताना तन आणि मन दोघेही वर्गातच असावेत. क्रिकेट खेळत असताना क्रिकेट खेळण्यातच लक्ष हवे. इतरत्र नाही. आलं का लक्षात काय म्हणतोय मी? फक्त तूच नाही सगळ्या वर्गाने हे लक्षात घेतले तर बरे होईल!", शिक्षक म्हणाले आणि पुन्हा फळ्याजवळ जावून गणित शिकवू लागले.
तर राजेशला असे हे एकंदरीत वेड होते लिहिण्याचे!
आपण लिहिलेले कधी कुणी वाचेल आणि त्यावर प्रतिक्रिया देईल याची अगदी आतुरतेने तो वात बघत बसे. अगदी पाचवीपासूनच त्याला स्वत:च्या लिहिण्याच्या प्रतिभेबद्दल कळून चुकले होते.
त्याचे निबंध सुद्धा अफलातून असायचे. कोणत्याही भाषेतला निबंध असो, कुणाला त्यात एकही चूक काढता यायची नाही. पैकीच्या पैकी मार्क दिल्याशिवाय शिक्षकांना दुसरा पर्याय नसे.
त्या दिवशी शाळा सुटल्यावर सगळा स्टाफ आणि विद्यार्थी निघून गेल्यानंतर खारकाते सर त्याला ग्राउंड वर भेटले, म्हणाले, "राजेश! मस्त लिहिले आहेस नाटक! मी सुद्धा याच विषयावर तुझ्या आधी थोडेफार असेच नाटक लिहिले होते, पण तुझे नाटक सुद्धा उत्तम आहे! असाच लिहित रहा! आपण स्वातंत्र्य लढ्यावर आधारित नाटक नक्की सदर करू!!"
आनंदाने राजेश त्यांना निरोप देऊन घरी जायला निघाला.
राजेशचे ते वय कुणा मोठ्या व्यक्तीच्या मनातील डावपेच ओळखण्याचे नक्की नव्हते पण त्याला वाटून गेले की आपल्याकडून पहिल्यांदा जेव्हा नाटक त्यांनी घेतले तेव्हा का बरे त्यांनी असा उल्लेख केला नाही की ते सुद्धा याच विषयावर लिहित आहेत?
पण जास्त खोलात त्याने विचार केला नाही. त्यला त्या सरांवर पूर्ण विश्वास होता.
तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा दिवस उजाडला. तीन मुख्य पात्रे असलेल्या, मनात देशभक्तीची ज्वाला जिवंत करणाऱ्या अशा उत्तम संवादांनी भरलेल्या त्या नाटकाला खूप प्रशंसा मिळाली. ते नाटक दहावीच्या मुलांनी सादर केले होते. त्याने लिहिलेल्या नाटकासारखेच ते होते पण त्यात थोडा बदल केला गेला होता पण संवाद मात्र त्याने लिहिलेले जसेच्या तसे होते....
मग बक्षीस समारंभात श्रीयुत खारकातेकर या आर्ट आणि कल्चरच्या शिक्षकांना बक्षीस मिळाले, स्वातंत्र्य लढ्यावर ते नाटक लिहिल्याबद्दल!
सगळीकडे टाळ्या पडल्या! आणि राजेशला आश्चर्याचा धक्का बसला.
त्या शिक्षकासाठी वाजणारी एकेक टाळी म्हणजे राजेशच्या राजेशच्या डाव्या आणि उजव्या कानावर एकापाठोपाठ एक जोरजोरात बसणाऱ्या थापडा त्याला वाटत होत्या. त्याचा मेंदू सुन्न आणि बधीर झाला. थोड्या वेळाकरता त्याला कसलाच आवाज ऐकू येईनासा झाला.
कार्यक्रम संपल्यानंतर त्याने खारकाते सरांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याची नजर चुकवून काढता पाय घेतला.
त्याच्या कथा चोरीबद्दल शिक्षकांविरोधात तो काही करू शकत नव्हता, कारण त्याचेकडे पुरावा नव्हता. कथेची आणखी एक ज्यादा प्रत त्याचेकडे नव्हती आणि स्टेजवर सादरीकरण करतांना नाटकात बरेच बदल केले गेले होते आणि ते खारकाते सरांनी स्वत:च्या नावावर खपवले होते! तसेच त्याने त्याचे लिखाण खारकाते सरांना दिल्याचा कोणताच पुरावा नव्हता!
त्याने ते नाटक लिहून खारकातेकरांना दिले होते हे दुसऱ्या कुणालाच माहिती नव्हते आणि कुणी ते पाहिलेही नव्हते. फक्त अंकब्रम्हे शिक्षकांच्या गणिताच्या तासाला त्याने लिहिलेल्या नाटकाबद्दल उल्लेख केला होता!
तो अंकब्रम्हे सरांना भेटला पण त्यांनी त्याचेवर विश्वास ठेवला नाही कारण खारकाते सरांची प्रतिमा सगळ्या स्टाफ मध्ये चांगली होती.
कुणावरही एकदम विश्वास टाकल्याचे नुकसान त्याला कळून चुकले आणि पण एक समाधान मात्र त्याच्या चेहऱ्यावर होते - त्याच्या नाटकाला सगळीकडून प्रशंसा मिळत होती. म्हणजे त्याचे लेखन चांगले होते...
त्या रात्री त्याला झोप येत नव्हती. आईला या सगळ्यातले काहीही कळत नव्हते. सांगून उपयोगही नव्हता. त्याने मुद्दामहून मित्रांना सांगणे टाळले. सांगून तरी काय होणार होते? इकडच्या कानाची लगेच तिकडे खबर व्हायला वेळ लागला नसता. खारकातेना कळले असते तर त्यांनी स्वत:च्या प्रतिमेचा वापर करत राजेशलाच खोटे ठरवले असते. त्या शिक्षकाच्या गोड भाषेला भुलून त्याने ते नाटक अगदी विश्वासाने त्यांचेकडे सोपवले होते आणि त्याचा विश्वासघात झाला होता. त्या शिक्षकांचे सामाजिक वर्तुळ व प्रभाव बघता त्याने त्या कथा चौर्याबद्दल कुणालाही सांगणे टाळले. पुन्हा त्या शिक्षकांसमोर सुद्धा त्याने कसलीही नाराजी दर्शविली नाही. याचे त्या शिक्षकांनाही आश्चर्य वाटले. तो अध्याय तिथेच संपला!!!
नाटकातील राजेशच्या प्रत्येक संवादाला टाळ्या मिळत होत्या त्यावरून राजेशला कळून चुकले की तो अगदी उत्तम संवाद लेखन करू शकतो!!
(क्रमश:)