प्रकरण 22
या सगळ्या घटनांदरम्यान सुप्रिया आणि रागिणी रूम सोडून गेल्यानंतर सोनीच्या दोन नवीन रुम पार्टनर्स झाल्या होत्या - एलेना एडवर्ड आणि नताशा दत्ता. सुप्रियाचा नंतर ठावठिकाणा न लागल्याने सोनीने तिला कॉल करणे सोडून दिले होते. सोशल साईटसवर सुद्धा सुप्रियाचे जुनेच अपडेट्स दिसत होते. पुण्याला जाणे झालेच तर मात्र तिने सुप्रियाला धावती भेट देण्याचे मनाशी ठरवले होतेच. रागिणी मात्र सोनीच्या संपर्कात होती. रागिणी तिच्या बॉयफ्रेंड सोबत हॅप्पी लाईफ जगत होती आणि सोनी "त्या" फोटो प्रकरणातून सावरली होती. तसे तिच्या दृष्टीकोनातून त्यामुळे तिचे फार काही फारसे नुकसान झाले नव्हते. पण नंतर तिला काही काळ कोणत्या डान्स कार्यक्रमाच्या ऑफर आल्या नाहीत, त्यामुळे निराश होती.
मग एके दिवशी अचानक आणि अनपेक्षितपणे "बिग आय बिग क्वेस्ट (Big Eye Big Quest)- मुझसे बचके कहां जाओगे?" नावाच्या मेगा रियालिटी शोची तिला ऑफर मिळाली. त्या शोच्या कास्टिंग डायरेक्टरने तिला त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा बोलावले होते तेव्हा त्याने तिला स्पष्टपणे संगितले होते:
"तुला मी एकाच कारणाकरता बेबक्यू (BEBQ) ची ऑफर देत आहे. ते कारण सांगण्याआधी ह्या शोबद्दल तुला सांगतो. या रियालिटी शोचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. यात दहा अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एका प्रायव्हेट रिसॉर्टवर वीस दिवसांकरता सोडले जातील. बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याची कोणतीच साधने त्यांना दिली जाणार नाहीत, अनलेस देयर इज एनी इमरजेंसी! त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यायचे आहे. त्यांना एक मिशन दिले जाईल. त्याचे नियम सांगण्यात येतील. त्यानुसार काही पॉईंट्स देण्यात येतील. शेवटच्या दिवशी फक्त तीन जण उरतील. एक विनर, दुसरा आणि तिसरा रनर्स अप!"
आयती संधी चालून आली होती. पण तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले, "मला डान्सच्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून माझ्याकडे एकही काम नाही. आता हा शो आहे पण यात डान्स नाही, पण पैसा मिळेल. प्रसिद्धी मिळेल. एरवी मी मॅडम अॅकॅडमी आणि इतर संस्थांमध्ये डान्स शिकत राहाणारच आहे. या शोनंतर बघूया, एखादी डान्स संबंधित दुसरी ऑफर नक्की मिळेल. आता फक्त मिळेल ते काम आणि पैसा महत्वाचा आहे!"
"काय विचारात पडलाय मॅडम? "
"अं, काही नाही. सॉरी, सांगा तुम्ही! मी ऎकतेय!"
"तर मी सांगत होतो की तुम्हाला या शोमध्ये घेण्याचे मूळ कारण मी तुम्हाला सांगतो. या शोमध्ये डान्स क्षेत्रातली तूच एक व्यक्ती असणार आहे. यात तुला डान्सचा वापर करून क्रिएटिव्ह अंगप्रदर्शन करावे लागेल. क्रिएटिव्ह अंगप्रदर्शन म्हणजे माझ्या मते असे की, तू जाणूनबुजून तुझे शरीर दाखवत आहेस असे लोकांना आणि प्रेक्षकांना वाटता कामा नये, त्याऐवजी रियालिटी शोच्या फ्लो मध्ये किंवा ओघात आपोआप असे प्रसंग येतील (जे आपण मुद्दाम टाकू) त्यातून अपरिहार्यपणे तुझी बॉडी तू एक्स्पोज करायची जी कृत्रिम वाटायला नको! तुझी सेल्फी अजून काही लोकांच्या नक्की लक्षात आहे! अजूनही तुझ्या त्या चित्राला रोज गुगलवर सर्च केलं जातं! कळलं का तुला मला काय म्हणायचे आहे ते? सरळ हिशेब आहे! मान्य असेल तर अॅग्रीमेंट आणि सायनिंग अमाऊंटचा एक लाखाचा चेक आणलाय सोबत!"
विचारात गढून सोनी मनाशी म्हणाली, "सेल्फीमुळे जे नुकसान व्हायचं ते झालंय! मला सतत माझे "वलय" टिकवायचे असले तर तडजोड करावी लागेलच! चला सोनी मॅडम स्वीकारा ही ऑफर!"
मग ती निर्मात्याला म्हणाली, "तयार आहे. अट मान्य आहे!"
अंधेरीच्या ऑफिस मध्ये "बिग आय" शोच्या त्या कास्टिंग डायरेक्टरने (के. सचदेवा) तिची एग्रीमेंटवर सही घेतली. तिला सायनिंग अमाऊंटचा चेक दिला आणि त्याच्या ऑफिस मधून सोनी निघाली.
प्रकरण 23
"लुप्थांसा एयर्लाइन्स" च्या विमानात रात्री बारा वाजता मुंबईहून ते दोघे बसले होते. सुबोध केतगावकर आणि सुप्रिया सोंगाटे! अर्थात आता तीही केतगावकर झाली होती! सुबोध पुण्याचा पण इटलीच्या रोम शहरात त्याला परमानंट जॉब होता. रोम जवळ असलेल्या पोमेझीया शहरात एका कंपनीत तो "टेक्निकल कोऑर्डीनेटर" होता. आता रात्रीचे नऊ वाजत आले होते. विमान "दा व्हिन्सी" विमानतळावर उतरायला सज्ज झाले होते. तशी अनाउन्समेंट झाली होती.
सुप्रिया सुबोधसोबत इटलीला स्थायिक होणार होती. विमानतळावर नऊ वाजता उतरल्यानंतर त्यांनी सगळ्या सिक्योरिटी आणि डॉक्युमेंट संबंधित फॉरमॅलिटिज पूर्ण केल्या, बॅग्ज कलेक्ट केल्या आणि दोघे विमानतळाबाहेर पडले. मग थर्मल वियर घालून ते रोम शहरातून पोमेझीया पर्यंत प्रायव्हेट कॅबने गेले. नवा देश, नवे शहर! तिला रूळायला वेळ लागणार होता. पोमेझिया मध्ये "ला एशीयाना" नावाच्या एका एशियन हॉटेल मध्ये ते गेले. टेबलावर बसल्यानंतर प्रथम भारतात दोघांच्या पेरेंट्सना कॉन्फरन्स मध्ये घेऊन त्यांनी सुखरूप पोचल्याचे कळवले. मग त्यांनी सँडविच, कॉकटेल आणि पिझा मागवला. सततचा प्रवास आणि जेट लॅगमुळे दोघांनाही थकवा वाटत होता.
"काय मॅडम, कसं वाटलं आमचं रोम शहर?", सुबोध म्हणाला.
"अगदी छानच! आवडलं. निदान प्रथमदर्शनी तरी आवडलंच!", सुप्रिया म्हणाली.
"थंडी मात्र थोडी जास्तच आहे नाही का?", सुबोध ने विचारले.
"हो. एवढी बोचरी थंडी मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवते आहे!"
"बियर घेणार का थोडी? थंडीत आवश्यक असते म्हणून म्हटलं!"
"तू घे तुला हवी असेल तर! मी तर कधी घेतली नाहीए पण कधीतरी गरज वाटली तर घेईन सुद्धा, पण आता नको!"
"ठीक! नो प्रॉब्लेम! आय विल टेक वन! यु एंजॉय युर पिझ्झा विथ कॉकटेल!"
त्यांनतर बराच वेळ ते दोघे न बोलता खाण्यापिण्यात मग्न होते. कारण दोघांनाही चांगलीच भूक लागली होती.
अचानक काहीतरी आठवून सुबोध म्हणाला, "अगं हो! मी मागे तुला बोललो होतो ना, तो 'प्राईम प्रॉस्पेक्ट' या इंग्रजी टीव्ही सिरीयलमधला तुझा फेवरीट टेलिव्हिजन अॅक्टर ‘फ्रांको बोनुकी’ रोम मध्ये म्हणजे आपल्या येथून जवळच राहातो. लवकरच आपण जाऊ त्याचेकडे! माझा एक ऑफिसमधला सहकारी ओळखतो त्याला."
"सो नाईस ऑफ यू सुबोध फॉर रिमेंबरींग इट!" असे म्हणून तिने त्याच्या ओठांवर एक छोटासा किस केला.
मग ते दोघेजण "सांता प्रोक्युला" येथे असलेल्या सुबोधच्या स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये आले. आतमध्ये हिटर्सची गरमी दोघांना सुखावून गेली. लग्नानंतरचा हा दहावा दिवस होता. इटलीत जाऊनच मग पहिल्यांदा "हनीमून" साजरा करायचा म्हणजेच पहिला सेक्स इटलीत घरी पोहोचल्यावर करायचा असे दोघांनी ठरवले होते व त्यांनी ते पाळले होते. दोघेजण फ्रेश झाले आणि बेडवर पहुडले. लग्नाआधीचे काही दिवस आणि लग्नानंतरचे दहा दिवस जाणूनबुजून ते एकमेकांपासून दूर होते. स्पर्श सुद्धा टाळत होते. जेवढे टाळत होते तेवढी मिलनाची ओढ जास्त वाढत होती. पण एवढा लांबचा प्रवास झाल्यानंतर त्यांना एकमेकांच्या बाहुपाशात लगेच झोप लागली..
आणि सकाळी पाच वाजता दोघांना एकाच वेळेस अचानक जाग आली. सुबोधला एक जाणीव झाली - एक अर्ध अनावृत्त स्त्री शरीर आपल्याला चिटकून झोपलं आहे! आणि अचानक झालेल्या त्या जाणीवेने त्याचं सर्वांग शहारलं आणि उत्तेजित झालं. सुप्रियाही जागी झाली होतीच पण ती मुद्दाम झोपेच सोंग घेऊन वाट बघू लागली की, सुबोध आता स्वतःवर किती नियंत्रण करू शकतो ते?
आता तो प्रसंग आला होता जो त्यांनी ठरवून टाळला होता! त्याने तिला आवेगाने जवळ ओढले आणि तिच्या सर्वांगावर ओठांनी तो किस घेत राहिला आणि मग दोघांची शरीरे एकमेकांना जाणून घेण्यास एवढी अधीर झाली की जणू काही दोन अतिशक्तीशाली इलेक्ट्रोमॅग्नेट एकमेकांच्या सान्निध्यात आलेत! मग वस्त्रांनी बंधने गाळून पडली.
स्त्री पुरुषाना एकमेकांवरचे मानसिक आणि शारीरिक प्रेम व्यक्त करता करता सगळ्यात शेवटी मिळणारी अत्युच्च अनुभूती काय असते ते दोघांनी आता प्रथमच अनुभवलं. मग त्यातून मिळालेल्या आत्यंतिक समाधानाने मंद पिवळ्या रंगाच्या प्रकाशात एकमेकांच्या वस्त्रविरहित शरीरांकडे, न्याहाळत आणि एकमेकांना कुरवाळत ते बराच वेळ पडून राहिले तेव्हा नुकतेच सहा वाजले होते.
तिच्या अंगावरून तसूभरही न बाजूला होता तो म्हणाला, "मॅडम! आज दिवसभर मी कुठेच जाणार नाही!"
"हो का? आणि मग ऑफिसात कोण जाणार? मी?" लटक्या रागाने ती म्हणाली.
"ना तू, ना मी! फक्त माझा बॉस आणि माझे कलिग्ज जातील ऑफिसला!"
सुप्रिया हसायला लागली.
"उठा. पहाट झाली. झोप संपली. स्वप्नांतून जागे व्हा. जीवनाचा रियालिटी शो सुरु झालाय! ऑफिसला जायची तयारी करा. सुट्टी संपली आहे," असे म्हणून तिने त्याला हळूच बाजूला ढकलले. अगदी अनिच्छेने तो उठला...
...काही वेळानंतर मध्येच बाथरूम मधून आंघोळ करतांना बाहेर येऊन तो म्हणाला, "आपला पहिला सेक्स होईल त्या दिवसापासून मी तुला प्रिया म्हणणार असं मी मनात ठरवलं होतं. आजपासून तू माझी प्रिया! आज की ताजा खबर, आज की ताजा खबर! सुप्रिया बनी प्रिया! जेव्हा जेव्हा मी तुला प्रिया म्हणून हाक मारेन तेव्हा तेव्हा तू आणि मी हा पहिला सेक्स आठवून ताजेतवाने होऊ!"
असे म्हणून त्याने तिला ही बाथरूम मध्ये ओढले. बराच वेळ बाथरूम मधून आनंद आणि हास्याचे आवाज येत राहिले...
सुबोध ऑफिसला गेल्यानंतर दिवसभर ती रिकामीच होती. आज लगेच तिला स्वयंपाक बनवायचा नव्हता. या आठवड्यात सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. एशियन शॉप मधून आणलेली काही फूड पॅकेट्स फ्रिज मध्ये होती, त्यात तिचे दुपारचे जेवणाचे काम भागणार होते. मग तिने आवरसावर सुरु केली. ते घर अगदी मनापासून तिला आवडलं. दरम्याम तिने आई वडिलांना आणि सुबोधच्या आईला भारतात फोन केला (सुबोधला वडील नव्हते) आणि खुशाली कळवली.
हॉलमध्ये एक फायरप्लेस होतं. बाजूला एक मोठी खिडकी आणि त्याबाजूला एक छोटंसं काचेचं कपाट होतं. त्यात अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके ठेवलेली होती. सुबोधासारखीच तिलाही वाचनाची आवड होतीच.
त्या घराची ओळख करून घेता घेता तिला बाजूला टेबलावर ठेवलेला एफ एम रेडिओ दिसला तो तिने ऑन केला. कोणतं तरी इटालियन गाणं सुरु होतं. त्यातले शब्द नीट कळत नव्हते पण ऐकायला वेगळाच आनंद यायला लागला आणि कोणत्यातरी अद्भुत दुनियेत गेल्यासारखं वाटत होतं ते गाणं ऐकून! त्या गाण्याने भारावून जाऊन आणि मंत्रमुग्ध होऊन तिच्या हातून भराभर कामं होऊ लागली. मराठी आणि इंग्रजी गाणे ती नेहमी ऐकायची पण इटालियन म्युझिक ती प्रथमच ऐकत होती.
ती त्या दिवशी बाहेर कुठेच गेली नाही कारण शहर, माणसं आणि तो देश हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. दुपारी फ्रिजमधील भाज्यांचे सॅन्डविच करून सॉस सोबत खाल्ल्यानंतर तिने सुबोधला कॉल केला. त्याला लवकर घरी यायला सांगून तिने फोन ठेवला. मग थोडा आराम करावा म्हणून ती बेडवर आडवी झाली. गेल्या काही महिन्यातल्या वेगवान घटना तिला आठवायला लागल्या...
(क्रमशः)