गॉथिक शैलीने बांधलेल्या एका भव्य बिल्डिंगमध्ये एक गौरवर्णीय उंचापुरा माणूस शिरतो. त्याच्या हातात बंदूक असते. भव्य दरवाज्यातून आत येताच आधी उजवीकडे आणि मग डावीकडे बघून तो बंदूक समोर धरतो. कुणी दबा धरून बसलेलं असेल तर त्याला हालचाल आणि हल्ला करायला मिळू नये म्हणून तो सावधगिरीने पावले उचलतो. त्याची नजर वर जाते. वर एक भव्य काचेचे झुंबर असते.
वरच्या बाजूला रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी बनलेला वाटावा असा भव्य गोल घुमट असतो. तो माणूस पुढे जात राहतो. दोन्ही हात नाकासमोर ताणून त्याने बंदूक धरलेली असते. पुढे गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत असे वाटणारे बांधकाम असते. त्या बाजूला काचेच्या रंगीत तुकड्यांतून मस्त सूर्यप्रकाश आत येत असतो. बहुतेक जे तो शोधत होता ते न सापडल्यामुळे त्या माणसाची निराशा झाली असावी.
....तो बंदूक खाली करतो आणि उलट्या दिशेने चालू लागतो. तो माणूस पाठमोरा वळताच, त्याच्या मागच्या त्या रंगीत काचेच्या खिडक्या ताडताड फुटतात आणि त्यातून लोखंडी दांडा हातात घेतलेला आणि स्टेनगन हातात घेतलेला असे दोन माणसं उड्या मारून खाली पडतात. खाली पडल्यावर ते दोघे उठतात आणि त्या आवाजामुळे तो बंदुकवाला माणूस सावध होऊन पुन्हा मागे वळतो. पण तो माणूस सावरायच्या आत लोखंडी दांड्यावाला त्याच्या हातावर दणका मारून त्याची बंदूक खाली पाडतो.
ती बंदूक खाली उचलण्याचे नाटक करत तो माणूस खाली वाकतो आणि वायूवेगाने मागच्या बाजूला पाय फिरवून स्टेनगन वाल्याला आणि लोखंडी दांड्यावल्या माणसाला एकाच वेळेस खाली पाडतो. स्टेनगन आणि दांडा दूर जाऊन पडतात.
आता तिघेही शस्त्र विहीन असतात. तिघेही धडाधड एकमेकांना भिडतात. हातापायांचे वार आणि थापडा एकमेकांना बसू लागतात. त्याचा चटाचट आवाज येऊ लागतो... बराच वेळ तिघांमध्ये धुमश्चक्री चालते. तो एकटा दोघांना भारी पडतो...
तीन बाजुंनी तीन हलते कॅमेरे आणि एक समोरून स्थिर कॅमेरा (सगळे कॅमेरे एका बाजूच्या अर्धगोलात) असे चार कॅमेरे हा प्रसंग टिपत होते कारण हा चित्रपट थ्रीडी असणार होता. तो एक इटालियन चित्रपट होता. दूरवरच्या बाकड्यांवर काही मोजके लोक ही शुटिंग श्वास रोखून बघत होते. त्यात सुप्रिया, सुबोध आणि त्याचा ऑफीसातला कलीग "व्हीटोरिओ अंतीनिओ" हे सुद्धा होते. तो बंदुकवाला माणूस म्हणजेच 'फ्रांको बोनुकी' होता. टीव्ही सिरीजनंतर त्याचा हा पहिला इटालियन चित्रपट होता. सुप्रियाचे फ्रांकोला याची डोळा बघण्याचे स्वप्न पूर्ण होत होते. ही सगळी शुटिंग इटलीच्या रोम शहरातील "सिनेसीत्ता" (इंग्रजीत - सिनेमा सिटी) या भव्य फिल्म स्टुडिओमध्ये होत होती. इटलीत येऊन आता दोघांना दोन महिने झाले होते. एका विकेंडला दोघे रोम शहर बघायला आलेले होते. प्रथम त्यांनी फिल्म स्टुडिओ बघितला. व्हीटोरिओच्या ओळखीने त्यांना ही शूटिंग बघायला मिळत होती.
'फ्रांको बोनुकी' इतका मोठा ऍक्शन शॉट देत असतांना सुद्धा त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. इतक्या शारीरिक कसरतीच्या सिन मध्ये सुद्धा त्याच्या मनात आठवणींचा कल्लोळ सुरु होता.
"एंजेलिना करोल"- त्याची गर्लफ्रेंड, जिच्यासोबत तो गेली चार वर्षे लिव्ह इन मध्ये राहात होता ती मागील सहा महिन्यांपासून बदलली होती. फ्रांकोला तिने एकसारखे बोलून बोलून डिवचायला सुरुवात केली होती. त्याची सुरुवात एका छोट्याशा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली होती. पण त्यातून राईचा पर्वत झाला होता आणि तो पर्वत दिवसेंदिवस मोठा मोठा होत चालला होता. आता गेल्या काही दिवसातला तो प्रसंग त्याला आठवला -
एंजेलिना त्याला इटालियन भाषेत खूपच टाकून बोलली होती -
"आंद्रे अल इन्फर्नो कोन ला तूआ रगझ्झा!'
म्हणजे -
"म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंड सोबत तू मसणात जा!"
त्याला बोलायचा चान्स न देताच तिने त्याला शिवीगाळ केली होती.
तिचा गैरसमज झाला होता. ती ज्या गर्लफ्रेंडबद्दल बोलली होती ती फ्रांकोची गर्लफ्रेंड नव्हती. त्याने लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण...ती ऐकत नव्हती.
तिला खरंच एक मुस्काटात द्यावे असे त्यावेळेस त्याला वाटले होते पण ती धाडकन त्याच्या तोंडावर दरवाजा आपटून त्या दिवशी बाहेर निघून गेली होती..
..फ्रांकोने अगदी जोर लावून समोरच्या माणसाच्या मुस्काटात दिली. एवढ्या जोरात की तो मार खाणारा समोरचा स्टंटमॅन अनपेक्षितपणे फ्रांकोकडे बघत राहिला आणि हेलपाटे खाऊन बराच दूर जाऊन पडला. पण कॅमेरामनच्या ते लक्षात आले नाही. तो शॉट जरुरीपेक्षा खूप जास्त रियल शूट झाला. पण फ्रांकोच्या लक्षात आल्यावर त्याने डायरेक्टरला खूण करून शूटिंग मधेच थांबवण्याची विनंती केली. त्या स्टंटमॅनला मदतीचा हात देऊन त्याने उठवले आणि सॉरी चुकून झाले म्हणून त्याची माफी मागितली. त्या दिवशीचा हा शेवटचा सिन असल्याने थोडे थांबून उरलेला सिन पुन्हा शूट करायचे ठरवले गेले. खरचटलेले आणि फाटलेले कपडे बदलले गेले.
व्हीटोरिओ, सुबोध आणि सुप्रिया हे तिघे फ्रांकोची फ्री होण्याची वाट बघू लागले. फ्रांको आणि बघ्यांमध्ये केव्हापासून बसून असलेली त्या चित्रपटाची हिरोईन "मार्सेला रमानो" हे दोघेजण आणि डायरेक्टर असे तिघेजण पिझ्झा खायला बसले. सोबत डाएट कोक होता.
व्हीटोरिओ वाट बघू लागला की फ्रांकोचे त्याच्याकडे दुरून का होईना थोडे लक्ष गेले तर बरे होईल. पिझ्झा खाऊन झाल्यावर थोडा आराम करण्यासाठी म्हणून बाजूच्या रूममध्ये जाण्यासाठी फ्रांको वळला तर त्याला नजरेच्या कोपऱ्यातून व्हीटोरिओ दिसला आणि त्याला हायसे वाटले. त्याच्या मनाला त्रास देणारा इश्यू विसरून अचानक त्याचे मन थोडे त्यातून बाहेर आले. फ्रांको स्वतःहून त्यांचेकडे चालत गेला तसे सुबोध आणि सुप्रिया नर्व्हस झाले आणि थोडे अलर्ट झाले.
सेटवरील इतर सर्वजण आपापल्या इतर कामांत गढून गेली. दरम्यान व्हीटोरिओने दोघांची ओळख फ्रांकोशी करून दिली. सुबोध कलाप्रेमी आणि सुप्रिया एक ऍक्टर आहे, दोन्ही भारतातून आलेत वगैरे थोडक्यात कल्पना दिली. व्हीटोरिओ आणि फ्रांको अनेक वर्षांपासूनन एकमेकांना ओळखत होते. अगदी थोड्या वेळाच्या त्या भेटीत सुप्रिया फ्रांकोला त्याचा अभिनय तिला आवडत असल्याचे सांगायला विसरली नाही. विशेष म्हणजे फ्रांको नावाप्रमाणे अगदी फ्रॅंक वाटला तिला! मनमोकळा! चित्रपट विषयावर त्यांनी थोड्या गप्पा केल्या. एक सेल्फी सुद्धा त्यांनी काढली. सुबोध सुप्रिया दोघेही खुश होते.
फ्रांको पुन्हा शूटिंगला निघून घेल्यावर व्हीटोरिओने सुद्धा त्या दोघांचा निरोप घेतला. दोघांनी अर्धे "सिनेसीत्ता" बघितले. नंतर पुन्हा वेळ मिळेल तसे ते पुन्हा येथे येणार होतेच. नाहीतरी सुबोध सुप्रिया सारख्या सिने रसिकांसाठी "सिनेसीत्ता" हे ठिकाण फक्त एकदा भेट देऊन एका दमात बघून मोकळे होण्यासारखे नव्हतेच!
एकंदरीत त्यांची त्या दिवशीची रोम ट्रिप स्मरणीय ठरली.
yyyy